Wed, Sep 26, 2018 08:15होमपेज › Satara › स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 10:58PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. रविवारी रात्री स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे आनंदा ज्ञानू इंगळे (रा. सैदापूर, ता. सातारा) यांचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अहवालामध्ये स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

आनंद इंगळे यांना स्वाईन फ्लू झाल्याच्या संशयातून त्यांना रविवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी शहरातीलच एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नसल्याने त्यांना सिव्हिलला दाखल करण्यात आले. तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

सैदापूर हे सातारा शहरालगतचे उपनगर आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यात स्वाईनचा रुग्ण सापडल्यामुळे सातारकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांची लागण लवकर होते. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे. 

दरम्यान, गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत शासकीय रूग्णालयात 216 स्वाईन फ्ल्यू संशयित रूग्ण दाखल होते. या सर्वांवर उपचार करण्यात आले. यामधील 8 रूग्ण हे स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले होते. तर उर्वरित रूग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करून सोडून देण्यात आले. इंगळे यांचा मृत्यू शासकीय रूग्णालयात झाला असला तरी सध्याच्या स्थितीत शहरातील खासगी रूग्णालयांमध्ये 6 स्वाईन फ्ल्यू लागण झालेले रूग्ण उपचार घेत आहेत.