Mon, May 20, 2019 08:07होमपेज › Satara › वीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू

वीज कर्मचार्‍याचा खांबावरून पडून मृत्यू

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:45PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

चिंचेवाडी (ता. पाटण) येथे विद्युतखांबावर काम करत असताना  खांबावरून पडून रामचंद्र बंडू चव्हाण  (वय 42) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. यामुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

भवानवाडी (ता. कराड) येथील रामचंद्र चव्हाण हे सहा महिन्यांपासून तारळेतील वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. सोमवारी (दि. 25) ते सहकार्‍यांसोबत चिंचेवाडी येथे काम करत होते. चव्हाण हे खांबावर बसून काम करत होते. तर त्यांचे सहकारी खाली काम करत होते. चव्हाण हे अचानक खांबावरून खाली कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पाश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चव्हाण कुटुंबीयांना वीज कंपनीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.