Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Satara › मानेच्या मणक्याची नस तुटल्याने निलेशचा मृत्यू

मानेच्या मणक्याची नस तुटल्याने निलेशचा मृत्यू

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:08PMकराड : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यातील  पैलवान निलेश विठ्ठल कंदूरकर (वय 20) याने कृष्णा रूग्णालयात शुक्रवारी पहाटे शेवटचा श्‍वास घेतला. अखेरच्या श्‍वासापर्यंत त्याने मृत्यूशी झुंज दिली. पण नियतीने  त्याच्या आयुष्याचा डाव मोडला. प्रसिध्द डीएनबी न्यूरोसर्जन डॉ. प्रसन्न पाटणकर हे त्याच्यावर उपचार करत होते. पै. निलेशला वाचविण्यासाठी डॉ. पाटणकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.  

पै. निलेशच्या उपचाराबाबत डॉ. पाटणकर म्हणाले,  निलेश ज्या वेळी कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता, त्यावेळी त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्याला श्‍वास घेताना त्रास होत होता. हाता पायांची हालचाल होत नव्हती. शौचविधी व लघवी यावर त्याचे कंट्रोल राहिले नव्हते. डोळेही अर्धेच उघडत होता. त्याच्या काही तपासण्या केल्यानंतर असे आढळून आले की त्याच्या मानेचा मणका तुटला असून तेथील नस पूर्ण निकामी झाली आहे. तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांचेही नुकसान झाले होते. 

त्याला आयसीयूमध्ये दाखल करून व्हेंटिलीटवर ठेवण्यात आले. त्याचे ब्लडप्रेशन फारच कमी झाले होते. ते वाढविल्याशिवाय पुढील उपचार करणे शक्य नव्हते. ब्लडप्रेशर वाढविण्यासाठी इंजेक्शन्स व औषधे सुरू केली. 
मणका तुटल्यामुळे तो सरळ करण्यासाठी तातडीने डोक्याला वजन  (ट्रॅक्शन) लावण्यात आले होते. या सर्व बाबी करून सुध्दा त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही. अन्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानेही निलेशवर काही उपचार करणे शक्य आहे का ते पाहिले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याला ज्यावेळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्याची अवस्था पाहून पाच ते दहा टक्केच त्याच्या जगण्याचे चान्सेस दिसून येत होते. त्याच्या नातेवाईकांना याची कल्पना देण्यात आली होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.  

Tags : Satara, Death,  Nilesh, due,  neck, failure