Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Satara › अंभेरी येथे वायरमनचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अंभेरी येथे वायरमनचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Published On: Jun 13 2018 9:15AM | Last Updated: Jun 13 2018 12:47AMकोरेगाव : प्रतिनिधी

अंभेरी, ता. कोरेगाव येथे वायरमन सचिन वसंत फाळके   (वय 35)  यांचा सोमवारी सायंकाळी  विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्‍त होत असून वीज वितरणच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. 

रहिमतपूरच्या उपविभागीय वीज वितरण कार्यालयात कार्यरत असणारे सचिन फाळके हे गेली पाच वर्षे अंभेरी बीटमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते.  सोमवारी (दि. 11) ते सायंकाळच्या सुमारास एस. टी. स्टँडरोड ते अंभेरी रस्त्यावर विश्‍वनाथ शिंगटे यांच्या वस्तीनजीक असणार्‍या विजेच्या पोेलवरील तांत्रिक दोष काढण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी खांबावर चढून ते दुरुस्ती करत होते. यावेळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून ते जमीनीवर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

उपसरपंच  दत्तात्रय निकम यांनी या  घटनेची माहिती वीज वितरण कार्यालयाला तसेच त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचवली. त्यामुळे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडलेली असतानाही वीज मंडळाचे कोणीही जबाबदार अधिकारी रात्री दहा वाजेपर्यंत घटनास्थळी फिरकले नव्हते. त्यामुळे उपस्थित जमाव व नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रहिमतपूर महावितरण कार्यालयातील प्रभारी उपअभियंता वाघ यांच्यासह सहा ते सात वायरमन उशिरा आल्याने त्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. सपोनि घनश्याम बल्लाळ यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत सर्वांना शांततेचे आवाहन केले. 

दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सचिन फाळके यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार  करण्यात आले.  सचिन फाळके  यांच्या पश्‍चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.