होमपेज › Satara › तेलाच्या फोडणीचा गृहिणींना बसणार चटका

तेलाच्या फोडणीचा गृहिणींना बसणार चटका

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:53PMसातारा : विशाल गुजर

महागाई, वाहतूकदारांचा संप याचा परिणाम बाजारपेठेत दिसू लागला आहे. गहू, रवा, मैदा, अटाच्या दरात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली असून आता तेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने गृहिणींना फोडणीचा चांगलाच चटका बसला आहे. भाजीपाल्याची आवक थोडीशी वाढली असून दरात घसरण सुरू झाली आहे. सर्वात जास्त कोथिंबिरीची आवक वाढली असून घाऊक बाजारात सरासरी तीन रुपये पेंढी झाली आहे. कडधान्यांच्या दरात फारशी चढउतार दिसून येत नाही.

श्रावण अवघ्या चार दिवसांवर  येवून ठेपल्याने बाजारात हळूहळू ग्राहकांची रेलचेल वाढलेली दिसत आहे. उपवासासाठी लागणार्‍या पदार्थांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापार्‍यांची धांदल उडाली, त्या पार्श्‍वभूमीवर शाबू, शेंगदाणे, गोडे तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरातही आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. एक नंबर शाबू 60 रुपये किलो असून सरासरी किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाणाच्या दरातही वाढ झाली आहे. प्रतिकिलो 80 व  100 रुपये दर राहिला आहे. रवा, अट्टा, मैदा व गहूच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात त्याचा सरासरी 32 रुपये किलो दर राहिला आहे. कांद्याची आवक थोडी मंदावली आहे; त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी  10 रुपये किलो झाला असून बटाट्याचा दर वीस रुपयांपर्यंत गेला आहे.

पावसाने थोडी उसंत घेतल्याने भाजीपाल्याची आवक बर्‍यापैकी सुरू आहे. कोबी, वांगी, ढब्बू, घेवडा, गवार, भेंडीच्या दरात थोडी घसरण झालेली दिसते. कारल्याची आवक थोडी मंदावल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली आहे. दोन-तीन आठवडे काहीसा वधारलेला टोमॅटो या आठवड्यात खाली आला आहे. घाऊक बाजारात सरासरी साडेसहा रुपये किलोपर्यंत दरात घसरण झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज दोनशेहून अधिक पोत्यांची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात तीस रुपये किलो दर आहे. फळ मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. अननस, डाळिंब, पपई, तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. सिताफळाची आवक सुरू झाली असून सफरचंद आपला दर टिकवून आहे.