Wed, Jul 17, 2019 12:25होमपेज › Satara › दत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा

दत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:41PMओझर्डे : वार्ताहर

सातारा येथील प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव याच्यावरील तक्रारींचा ओघ आता सुरू झाला आहे. त्याच्यासह 8 साथीदारांनी पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून भंगार विक्रेत्यांची 38 लाखांची रोख रक्‍कम लांबवली असल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना डिसेंबर 2017 मधील आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इकबाल सय्यद तालीब हुसेन (वय 48, रा. भुईंज, ता. वाई) हे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दि. 13 डिसेंबर 2017 रोजी किसन वीर कारखान्यावर विक्रीस काढलेल्या भंगाराची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सातार्‍यातील शुकराज पांडुरंग घाडगे, शामराव तिवारी व कुमार खत्री यांची ओळख झाली. कारखाना परिसरातून बाहेर आल्यानंतर दत्ता जाधव हा त्याच्या साथीदारांसह बाहेर उभा होता. त्यावेळी त्याने अडवून भंगाराचे टेंडर हवे असल्यास 10 लाख रुपयांची मागणी हुसेन यांच्याकडे केली. त्यावेळी जाधव याच्याकडे पिस्तूल होते. त्याच्यासोबत घाडगे, तिवारी व खत्री व त्यांच्यासह इतर 5 साथीदार होते. टेंडर घ्यायचे असल्यास आमच्या नावावर घ्यावे लागेल, असा दमही दिला होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यावेळी हुसेन व दत्ता जाधव यांच्यात तडजोड होऊन कारखान्याकडील भंगार घेण्यासाठी 1 कोटी 35 लाख 50 हजार रुपयांचे टेंडर भरण्याचे एकमत झाले. टेंडरच्या आगाऊ रक्‍कम भरण्यासाठी दत्ता जाधव हा   हुसेन यांच्याकडून  4 लाख रूपये घेवून गेला. त्यानंतर पुन्हा पुन्हा घाडगे हा हुसेन यांच्या सोबत असणार्‍या आरिफ पटेल यांना फोन करून पैशाची मागणी करू लागला. यानंतर पुन्हा दत्ता जाधव याने किसनवीर कारखाना परिसरात येऊन हुसेन यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली.

यावर हुसेन यांनी नकार दिल्यानंतर दत्ता जाधवने त्यांचे भंगाराचे दुकान बंद पाडले. त्यामुळे हुसेन यांनी दत्ता जाधव याला पैसे दिले. यानंतर वारंवार पैशाची मागणी होत असल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी हुसेन यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हुसेन यांना पुणे येथे नेऊन मारहाण केली. दत्ता जाधव याने वेळोवेळी पिस्तुलाचा धाक दाखवून आजतागायत 38 लाख रूपयांची खंडणी घेतल्याची तक्रार हुसेन यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात केली आहे. तपास सपोनी बाळासाहेब भरणे करत आहे.