Thu, Apr 25, 2019 05:52होमपेज › Satara › कारवाईवेळी दत्ता जाधव व टोळीकडून धक्‍काबुक्‍की : गुन्हा दाखल

कारवाईवेळी दत्ता जाधव व टोळीकडून धक्‍काबुक्‍की : गुन्हा दाखल

Published On: May 05 2018 3:55PM | Last Updated: May 05 2018 3:55PMसातारा : प्रतिनिधी

मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरात गेलेल्या पथकातील सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल स्वामी यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी दत्ता जाधव याच्यासह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतापसिंहनगरात राहणार्‍या दत्ता जाधव याच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, तेव्हापासून दत्ता जाधव हा पसार होता. त्याचे वास्तव्य प्रतापसिंहनगरात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी शुक्रवारी पोलीस प्रतापसिंहनगर येथे गेले होते. दत्ता जाधव हा देवळाजवळ असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साध्या वेशात असणार्‍या कर्मचार्‍यांची सगळी पथके त्या परिसरात एकत्रित करण्यात आली.

पोलिसांच्या शोध मोहिमेवेळी दत्ता जाधव हा पत्र्याच्या शेडमध्ये लपल्याचे आढळल्यानंतर त्याला पकडण्यात आले. दत्ता जाधव याला पकडल्यानंतर त्याने पोलिस पथकात असणार्‍या अनिल स्वामी या पोलीस कर्मचार्‍यास धक्काबुक्की केली. पोलिसांनी दत्ता जाधवला पकडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी लक्ष्मी जाधव,  रमेश खुडे, गंगूबाई, झुंबर (पूर्ण नाव नाही) व इतर काहीजण आले. जाधवसह इतरांनी पोलीस पथकात असणार्‍या स्वामी यांचा गळा दाबला तसेच त्यांना खाली पाडून मारहाण करणे सुरु केले. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना तेथून  पिटाळून लावले.

या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल खाडे यांनी रात्री तक्रार दिली. त्यानुसार दत्ता जाधवसह पाचजणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा केला आहे. दरम्यान, जत येथेही पोलिस पकडण्यासाठी गेल्यानंतर अशाच पध्दतीने पोलिसांवर हल्‍ला केला होता. दहा दिवसांपूर्वी त्याने परत पोलिसांवर हल्‍ला केला आहे.

दत्ता जाधवचा ताबा पुसेगाव पोलिसांकडे..

गुंड दत्ता जाधव याच्याविरुध्द पुसेगाव पोलिस ठाण्यात सावकारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. शुक्रवारी रात्री त्याला प्रतापसिंहनगर येथून अटक केल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथून प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर पुसेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. 14 पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.