Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Satara › थांबा, पहा अन् नुसतेच जा...

थांबा, पहा अन् नुसतेच जा...

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:32AMतासवडे टोलनाका : प्रविण माळी 

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ ही प्रचलित म्हण खोटी ठरवणारी कामगिरी खोडशीतील वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी केली आहे. याच अजब कामगिरीमुळे गेली दीड वर्ष  महामार्गालगत एक विद्युत खांब धोकादायक स्थितीत कललेल्या अवस्थेत उभा आहे. 

शेतात पिकांना टेकायला आलेल्या विद्युत वाहिन्या, कललेले विद्युत खांब आणि त्याकडे वीज वितरण कंपनीचे होणारे दुर्लक्ष आपण नेहमीच ऐकतो, पाहतो. असाच काहीसा प्रकार खोडशीनजीक पहावयास मिळत आहे. मात्र याठिकाणची परिस्थिती खूपच भयावह आहे. खोडशीतून महामार्गावर जाण्यासाठी ज्या मार्गाचा ग्रामस्थ वापर करतात, त्याच सर्व्हिस रस्त्यालगत एक विद्युत पोल धोकादायकरित्या कललेला आहे. महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची रहदारी होते. महामार्गाच्या पूर्व बाजूकडून आलेल्या विद्युत वाहिन्या पश्‍चिम बाजूला असलेल्या या खांबाला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्युत खांब पडल्यास विद्युत वाहिन्या महामार्गावरील वाहनांवरच पडणार आहेत, हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज भासत नाही.

याशिवाय परिसरात एक मंगल कार्यालय आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने याठिकाणी लोकांची वर्दळ असते. याशिवाय खोडशीतून कराडकडे जाणार्‍या ग्रामस्थ व शेतकर्‍यांवरही या विद्युत खांबामुळे सुरक्षिततेबाबतची टांगती तलवार कायम आहे. मात्र एवढे होऊनही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना हे दिसत नाही. दप्तर दिरंगाईमुळे सरकारी काम म्हटले की सहा महिने थांबण्याची तयारी सर्वसामान्यांची असते. मात्र याबाबतची प्रचलित उक्तीही खोटी ठरवत ‘सरकारी काम अन् दीड वर्ष झाले तरी अजूनही थांबच’ ही नवीन उक्ती आपल्या अजब कार्यक्षमतेने वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी तयार केल्याचे पहावयास मिळते. दोन दिवसांपूर्वी घोणशी येथे दुर्दैवी घटनेत एक मजुराचा बळी गेला आहे. त्यामुळे वीज कंपनीस आतातरी जाग येईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

‘तो’ मजकूर अन् योगायोगाची चर्चा ...
धोकादायक अवस्थेतील विद्युत खांबापासून दहा फुटाच्या अंतरावर महामार्गालगत एक फलक उभा करण्यात आला आहे. महामार्गावर जाताना सर्व्हिस रस्त्यावरील वाहन चालकांसाठी सूचना देणारा हा फलक आहे. या फलकावर ‘थांबा, पहा, जा’ असा मजकूर आहे. मात्र हा मजकूर वाहतुकीसाठी आहे की धोकादायक खांबासाठी आहे? हेच याठिकाणी गेल्यावर समजत नाही.
 

Tags : satara, taswade,  electric pillar, highway