Fri, Sep 21, 2018 00:26होमपेज › Satara › अखेर तो धोकादायक खांब बदलला

अखेर तो धोकादायक खांब बदलला

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 10 2018 11:17PMमायणी : वार्ताहर 

दै. ‘पुढारी’ च्या वृत्ताची तातडीने दखल घेत येथील बायपास रस्त्यालगत असलेला धोकादायक अवस्थेतील  विद्युत खांब वीज वितरण कंपनीने तातडीने हटवून त्याठिकाणी नवीन विद्युत खांब उभा केल्याने वीज वितरण कंपनीला तसेच दै.पुढारीला मालवाहतूकदार संघटना, ग्रामस्थांनी धन्यवाद दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, चांद नदी पुलापासून सुरू होणार्‍या बायपास रस्त्यालगत वीज मंडळाचा मध्यम उच्चदाब वाहिनीचा विद्युत  खांब असून या खांबास वाहन धडकल्याने तो खांब वाकलेला होता. त्या खांबावरील विद्युत वाहक तारा लोंबकळलेल्या स्थितीत होत्या. मध्यम स्वरूपाच्या वीजवाहक तारा असल्याने इथे मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वीज वितरणने खांब बदलण्याच्या दृष्टीने काम हाती घेत खड्डा खोदला होता. परंतु, आठ दिवस होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. 

याच अवस्थेत या बायपास मार्गावरून धोकादायक खांबाजवळून  शेकडो  डंपर  तथा अन्य वाहनांची वाहतूक सुरू होती. याबाबतची वस्तुस्थिती दै. ‘पुढारी’ने सचित्र प्रसिद्ध करून धोकादायक वीज खांब बदलण्याची मागणी केली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत वीज मंडळाने गुुरुवारी तो खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब उभा केला व संभाव्य धोका टाळला.

धोकादायक खांबामुळे जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवत खांब बदलण्याची आवश्यकता दै. ‘पुढारी ’ने  आपल्या वृत्तात मांडली होती. वीज मंडळाला हे काम करण्यास भाग पाडल्याबद्दल मालवाहतूकदार संघटना, ग्रामस्थांनी दै. ‘पुढारी’ ला धन्यवाद दिले आहेत.