होमपेज › Satara › महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावर धोकादायक दरड

महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावर धोकादायक दरड

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 8:49PMसातारा : प्रतिनिधी

महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावर मेटतळे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर गेल्या  3 ते 4 महिन्यांपासून महाकाय दगड रस्त्यावर कोसळण्याच्या मार्गावर असून याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. तसेच याच ठिकाणी रस्ता  खचू लागला असल्याने वाहनधारकांना  येथून जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिक व वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.

महाबळेश्‍वर पोलादपूर दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. तसेच पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मेटतळे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर महाकाय दरड कोसळण्याच्या बेतात आहे.  छोटे दगड पडलेल्या ठिकाणाहून साधी वाहनेही निट जात नाहीत त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांना महाबळेश्‍वर ते वाडा कुंभरोशी रस्त्यांचा अंदाज आहे.सध्या शैक्षणिक संस्थांचा सहलींचा हंगाम आहे त्यामुळे या रस्त्यावरून प्रतापगडकडे जाणार्‍या पर्यटकांचा लोंढा वाढला आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यतील वाहनचालकांना या रस्त्याचा अंदाज नाही. अपघातासारखे प्रसंग घडण्याची शक्यता  नाकारता येत नाही.

येथील ग्रामस्थ व वाहनचालकांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रार केली मात्र, कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे  न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न वाहनचालकांसह नागरिकांना पडला आहे. दरडीचे दगड पडलेल्या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. संंबंधित विभागाकडून या ठिकाणी तीन ते चार बॅरल लावण्यात आले असले  तरीही  येथे गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. संंबंधित विभागाने या घटनेची दखल घेवून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांमधून उपस्थित होत आहे.

महाबळेश्‍वर ते वाडा कुंभरोशी दरम्यान  2 ते 3 ठिकाणी रस्ता खचला आहे. पावसाळा संपल्यानंतर संबंधित विभागाने या रस्त्याचा सर्व्हे करून खचलेल्या रस्त्याची डागडूजी करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याकडून याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यात आले आहेत मात्र, या खड्ड्यावर साधा रोलर फिरवला नाही त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.