Tue, Mar 26, 2019 12:07होमपेज › Satara › राकुसलेवाडीत आगीमध्ये ५ घरे खाक

राकुसलेवाडीत आगीमध्ये ५ घरे खाक

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMवेणेगाव : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी येथे रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच घरे अक्षरश: जळून खाक झाली. या घटनेत संसारोपयोगी साहित्य बेचिराख झाले असून सुमारे 12 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी टळली. 

राकुसलेवाडी येथे रत्नमाला आनंदराव मोरे, नंदा श्रीरंग मोरे, अरुण रामचंद्र मोरे, लक्ष्मण यशवंत मोरे आणि चंद्रकांत यशवंत मोरे यांची कौलारू पत्र्याची सलग पाच घरे आहेत. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रत्नमाला मोरे यांना मुंबईहून त्यांच्या सूनबाईचा फोन आला होता. याचदरम्यान मोबाईलवरून संभाषण चालू असताना अचानक घरातून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.  बघताबघता धुराचे अन् आगीचे लोट बाहेर पडू लागले. आगीची भीषणता एवढी वाढली की लगतच्या पाचही घरांना ज्वाळांनी वेढले.

गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आगीची भीषणता भयावह असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. सातारा नगरपालिका व अजिंक्यतारा कारखान्याचे अग्‍निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सार्‍यांच्या प्रयत्नानंतर सुमारे चार तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत संसारोपयोगी साहित्यासह धान्य, पाण्याचे इंजिन, प्लास्टिक पाईप, कटर मशीन, टीव्ही संच, होमथिएटर, कपडे, शासकीय कागदपत्रे आदी साहित्य जळून खाक झाले होते.

या आगीत रत्नमाला मोरे यांचे 4 लाख  66 हजार 500 रूपयांचे नुकसान झाले. नंदा मोरे यांचे 3 लाख 65 हजार 500 रूपये, अरूण मोरे यांचे 1 लाख 40 हजार 500 रूपये, लक्ष्मण मोरे यांचे 1 लाख 67 हजार 500 रूपये तर चंद्रकांत मोरे यांच्या घराचे 17 हजार रुपये असे एकूण 11 लाख 57 हजार रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी तलाठी महेश चव्हाण यांनी शेंद्रे मंडलाधिकारी एस.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत नुकसानीचा पंचनामा केला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे, संजय दिघे, चेतन बगाडे, स्वप्नील माने, भगवान इंगुळकर, समाधान राक्षे, धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.