Tue, Jun 02, 2020 01:50
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘सावित्री’नंतर झालं गेलं ‘पंचगंगे’ला  मिळालं

‘सावित्री’नंतर झालं गेलं ‘पंचगंगे’ला  मिळालं

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 9:13PMसातारा : संजीव कदम

कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य ‘त्या’ घटनेची तीव्रता असेपर्यंतच राहते. प्रशासनाची कार्यक्षमता तर अनेकदा असेच अनुभव कथन करते. ‘सावित्री’ पुलावरील दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील धोकादायक पुलांचा सर्व्हेही झाला. मात्र, त्यानंतर या पुलांची डागडुजी अथवा पर्यायी व्यवस्थेसाठी यंत्रणेकडून गांभीर्याने कार्यवाही झालीच नाही. यंत्रणांच्या उदासिनतेमुळे  ‘सावित्री’नंतर झालं गेलं ‘पंचगंगे’ला मिळालं असाच अनुभव आला. दरम्यान, पंचगंगेच्या दुर्घटनेेने तरी  सातारा जिल्ह्यातील कुचकामी पूल व ढिसूळ संरक्षक कठड्यांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे का?

पंचगंगेवरील थरारक दुर्घटनेने 13 जणांचे बळी घेतले. या घटनेमध्ये  ट्रव्हलर चालकाचाच दोष असला तरी ढिसूळ व कुचकामी संरक्षक कठडे दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. या दुर्घटनेने विशेषत: धोकादायक पुलांचा भयावह प्रश्‍नही पुन्हा एकदा समोर आला आहे. 3 ऑगस्ट 2016 रोजी कोकणात सावित्री पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील कुचकामी ठरणार्‍या व धोकादायक स्थितीत उभ्या असणार्‍या अनेक पुलांचा प्रश्‍न गांभिर्याने घेतला गेला. मात्र, त्यानंतर त्याची तीव्रता कमी होताच झाले गेले ‘पंचगंगे’ला मिळाले, अशीच मानसिकता यंत्रणेची पहायला मिळाली. आता पंचगंगा नदीवरील दुर्घटनेने धोकादायक पुलांचे व्यवस्थापन पाहणार्‍या यंत्रणांच्या डोळ्यात पुन्हा एकदा झणझणीत अंजन गेले आहे. 

अनेक ब्रिटीशकालीन पुलांचे आयुष्यमान संपले असून त्यांच्या डागडुजीचा अथवा पर्यायी पुलाचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडून तयार झाला असल्याचे ऐकीवात असले तरी प्रत्यक्षात मात्र कार्यवाहीच्यादृष्टीने हालचाली होत नसल्याचे दिसत आहे. 
  
कराडलगतच्या जुन्या कोयना पुलाचे दुखणेही अजूनतरी कायमच आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 1868 सालचा ब्रिटिशांनी बांधलेला दगडी बांधकाम असलेला कराडचा हा जुना पूल. राणी व्हिक्टेरिया यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे राणी व्हिक्टेरियाचा पूल असे म्हटले जाते.  या पुलास 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कराड नगरपालिकेस पुलाच्या डागडुजी संदर्भात पत्र पाठवून माहिती कळवण्यात आली  होती. 

सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली येथे असाच वयोमर्यादा ओलांडलेला एक पूल असून त्याला तब्बल 107 वर्षे पूर्ण झाली आहेत.  त्यामुळे हा पूल दुरूस्त करून घ्यावा, याबाबतचे पत्रही ब्रिटिशांकडून आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने माहुली पूल हा ‘डेथलाईन’च्या वाटेवर आहे. वारंवार होणारे अपघात आणि कमकुवत होत असलेले बांधकाम यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. 

वाई शहराला जोडणार कृष्णा पुल हा ब्रिटीश कालीन पुल आहे. ब्रिटीशांनी या पुलाच्या कालमर्यादेला 100 वर्षाची गॅरंटी दिली होती. आज 117 वर्षापर्यंत हा पूल उभा आहे. पालिकेला या पुलाला 100 वर्षे पूर्ण होताच ब्रिटीश अधिकार्‍यांनी पत्रव्यवहार करुन पुलाची गॅरंटी संपल्याचे लेखी पत्र पाठवले होते. या पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणूनच महागणपती पुल बांधण्यात आला. तरीही या कृष्णा पुलावरुन दररोज हजारो वाहनांची रेलचेल सुरु असते. बाजारपेठेत व्यापारी माल घेऊन येणारी व वाई औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड वाहने या ब्रिटीशकालीन पुलावरुन जातात. यासाठी सध्यातरी या पुलाची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे.

फलटण शहरालगत प्रमुख रस्त्यावरील 4 पूल व इतर ठिकाणचे अनेक ब्रिटीशकालीन 125 वर्षांपूर्वीचे पूल धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या ठिकाणी नवीन पूल बांधणार कधी? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. फलटण शहरातून बाहेर पडताना व फलटणमध्ये प्रवेश करताना प्रवाशी अक्षरश: जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत. 

पुणे - बंगळूर या जुन्या महामार्गावरील वर्ये, ता. सातारा गावाजवळील वेण्णा नदीवरील पूल ब्रिटीश काळातील असून  वाहतुकीचा ताण वाढल्याने पूल धोकादायक बनला आहे. पिंपाळाची झाडे पुलाच्या भिंतीवर उगवली असल्याने धोका निर्माण झाला आहे. वेण्णा नदीवरील जुन्या हायवेवर असणारा या पुलाला सुमारे 100 वर्षे झाली असतील. संपूर्ण दगडी बांधकामातील असलेल्या या पुलास मोठाले आठ गाळे आहेत. अरुंद असलेल्या या पुलावरुन पूर्वी दोन वाहने जात नव्हती. सुमारे 10 ते 15 वर्षांपूर्वी या पुलावर काँक्रीटीकरण करत पुलाचे वरच्यावर रुंदीकरण करण्यात आले आहे. तेव्हापासून या पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरु आहे. 

इतिहासाचा साक्षीदार असलेला वडूथ-आरळे, ता. सातारा येथील कृष्णा नदीवरील पूल श्री. छ. शहाजीराजे भोसले यांच्या औदार्याने दि. 30 जून 1845 रोजी सुरु करण्यात आला होता. 172 वर्षाचा हा ऐतिहासिक पूल चांगल्या स्थितीत असला तरी काही ठिकाणचे संरक्षक कठडे तुटले असल्याने भविष्यात धोकादायक स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. 

लोणंद -सातारा रस्त्यावरील वेअर हाऊसजवळील सरहद्देच्या ओढयावर असणारा ब्रिटिशकालीन पुल धोकादायक असुनही त्या पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मोठ्या अपघाताचा धोका वाढला आहे. या पुलाशेजारी नवीन पूल उभारण्यात आला असून निकष्ट कामामुळे या नवीन पुलाबरोबरच जुन्या पुलावरून एस.टीसह लहान मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. कठडे तुटल्याने पुल धोकादायक झाला होता. त्यामुळे या पुलाशेजारीच दुसरा नवीन पूल उभारण्यात आला होता .परंतु या नवीन पुलाचे काम अर्धवट अवस्थेत व निकृष्ट दर्जामुळे तसेच मोठमोठ्या खड्यामुळे या पुलाच्या वापराबरोबर जुन्या धोकादायक पुलाचाही वाहतुकीसाठी वाहने वापर करत आहेत.