Fri, Jul 19, 2019 07:41होमपेज › Satara › सातार्‍यात दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

सातार्‍यात दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:18PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपरिषदेच्यावतीने शुक्रवार दि. 25  ते रविवार दि. 27  मे 2018 दरम्यान माजी नगराध्यक्ष कै. श्री. छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन शाहू कलामंदिर येथे करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष  सुहास राजेशिर्के व सौ. सुजाता राजेमहाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून महाराष्ट्रातील नामवंत नाट्य संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, महाड, चिपळूण, चंद्रपूर, मुंबई, कल्याण, पुणे व  औरंगाबाद आदी शहरातील दर्जेदार एकांकिका पाहण्याची संधी सातारकर नाट्य रसिकांना उपलब्ध होत आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेतून व सातार्‍याच्या नाट्य चळवळीस अधिक गती देण्याच्या उद्देशाने संपन्न होत असलेल्या या एकांकिका स्पर्धेत सांघिक तसेच अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, बाल कलावंत आदी अशी एकूण 36 पारितोषिके देण्यात येणार आहेत.

रोख रक्कम व मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. रोख रकमेची सव्वा लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा सातारकर नाट्य रसिकांना मोफत पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांच्या समितीसह माजी नगरसेवक कल्याण राक्षे, हेमांगी जोशी यांच्या बरोबरीने सातार्‍यातील सर्व रंगकर्मी परिश्रम घेत आहेत. सातारकर नाट्य रसिकांनी या स्पर्धेस उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहनही नगराध्यक्षांनी केले आहे.