Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Satara › भीषण अपघातात डीवायएसपी प्रेरणा कट्टे गंभीर 

भीषण अपघातात डीवायएसपी प्रेरणा कट्टे गंभीर 

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 11:15PMकोरेगाव : प्रतिनिधी

कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या वाहनाला रविवारी पहाटे 3 च्या सुमारास रहिमतपूर-औंध मार्गावरील पिंपरी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला  27 टाके पडले आहेत. या दुर्घटनेत चालकही जखमी झाला असून दोघांवर सातार्‍यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्र, गस्तीदरम्यान पहाटे 3 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्रेरणा कट्टे यांचे सातारा पोलिस मुख्यालयात कामकाज असल्याने रात्री उशिरापर्यंत त्या सातार्‍यातच होत्या. त्यानंतर पोलिस ड्युटीचा भाग असणार्‍या जिल्हा रात्रगस्तीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या कोरेगाव उपविभागीय कार्यालयाची जीप (क्र. एमएच 11 एबी 308) जीप घेऊन चालक प्रवीण शिंदे (रा. एकंबे, ता. कोरेगाव) व आरटीपीसी अविनाश घाडगे यांच्यासह रात्रगस्त करत होत्या. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची जीप  रहिमतपूर-औंध रस्त्याला आल्यानंतर पिंपरी फाट्याच्या अलीकडे असणार्‍या महादेव मंदिरानजीक चालकाचा जीपवरील ताबा सुटला. त्यामुळे जीप थेट झाडाला धडकली. 

हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झाला होता. त्यानंतर ही गाडी रस्त्यावरुन काही अंतरावर फरफटत  खाली गेली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ सातारा व कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कोठे झाला याची माहिती नसल्याने पोलिसांनी पिंपरी फाटा परिसर चाळून काढला. त्यानंतर अलीकडे आल्यानंतर गाडीच्या चाकाच्या व्रणावरून गाडी खाली गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी प्रेरणा कट्टे यांच्यासह चालकाला उपचारासाठी सातार्‍याला हलवले.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी प्रेरणा कट्टे व शिंदे यांची विचारपूस केली. तसेच कुटूंबियांनाही आधार दिला. या अपघाताची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.