सातारा : प्रतिनिधी
पोलिस महासंचालक सतीश माथूर सातारा जिल्हा दौर्यावर असतानाच पूर्वसंध्येला सातारा जिल्हा पोलिस दलातील तब्बल 18 पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना ‘पोलिस महासंचालक पदक’ जाहीर झाले आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर, फौजदार राजेंद्र यादव, सहायक फौजदार बापू बागल, जयंत कुलकर्णी, पुरुषोत्तम देशपांडे, दादासो यादव, सुरेश चव्हाण, किशोर जोशी, लक्ष्मण डोंबाळे, दशरथ रुपनवर, रामभाऊ गोरे, आनंदराव सपकाळ, मनोहर फरांदे, अविनाश बाबर, नासीर बागवान, पोपट जगदाळे, शशिकांत खराडे, सुधीर बनकर अशी महासंचालक पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची नावे आहेत. महाराष्ट्र दिनी दि. 1 मे रोजी त्यांना या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
दरवर्षी राज्य पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान केला जातो. विविध सन्मानांपैकी पोलिस महासंचालक पदक हे एक महत्त्वपूर्ण पदक आहे. गतवर्षीही सातारा पोलिस दलात महासंचालक पदक मोठ्या प्रमाणात जाहीर झाली होती.
बुधवारपासून पोलिस महासंचालक सतीश माथूर सातारा दौर्यावर आहेत. सातारा येथील पोलिसांचा कार्यक्रम झाल्यानंतर ते महाबळेश्वर येथे रवाना झाले. ते सातार्यातून गेल्यानंतर पोलिस महासंचालक पदकांची यादी जाहीर झाल्याचा योगायोग घडला आहे. दरम्यान, यावर्षीही तब्बल 18 जणांना हे पदक जाहीर झाल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पोलिस दलातून पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.