होमपेज › Satara › सायबर क्राईम : पंजाबमधून दोघांना अटक

सायबर क्राईम : पंजाबमधून दोघांना अटक

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 10:56PMसातारा: प्रतिनिधी

सातार्‍यातील एका नामांकित कंपनीचा बँकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सिम स्वाईप करून कंपनीच्या बँक खात्यातील 37 लाख 78 हजार रुपये देशातील विविध राज्यांतील बँक खात्यांत ट्रान्स्फर केले होते. या प्रकरणाच्या मूळाशी जात सातारा सायबर पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन दोघांना अटक केली. अभिषेक सुनील कुमार (वय 20, रा. पंजाब) व यादविंदर नरेंद्र सिंग (वय 34, रा. पंजाब) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

काही दिवसांपूर्वी शहरातील एका कंपनीच्या बँकेंच्या खात्यातील 38 लाख रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्यात आला होता. हे सायबर क्राईम असल्याने याच्या मुळाशी जाण्याचे पोलिसांनी ठरवले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक पंकज देशमुख   यांनी सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पद्माकर घनवट, सपोनि गजानन कदम यांनी संशयित आरोपींची माहिती संकलित केली. या माहितीचे अवलोकन करून वरिष्ठांनी तात्काळ झिरकपूर, पंजाब येथे तपास पथक रवाना केले. या पथकाने पंजाब येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यामध्ये सहभागी असणार्‍या अभिषेक कुमार व यादविंदर सिंग यांना अटक केली. 

त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पो.ना. विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, निखील जाधव यांचा पथकात सहभाग होता. तर शंकर सावंत, महेश शेटे, सचिन पवार, तुषार साठे, वर्षा खोचे, सुशांत कदम, अनिकेत जाधव, प्रवीण अहिरे, ज्योती कोंडावळे, यशोमती साळूंखे, गणेश कचरे व मारूती अडागळे यांनी तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण करण्यास सहकार्य केले.