Tue, Aug 20, 2019 04:22होमपेज › Satara › नव्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

नव्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 9:23PMसातारा : प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षापासून  आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. त्यामुळे नवीन पाठ्यपुस्तके कशी असतील याबाबत  शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे. नवीन पुस्तके बाजारात  येण्याअगोदरच नवीन अभ्यासक्रमानुसार 5 एप्रिलपासून शिक्षकांचे प्रशिक्षण होणार असून  त्यानंतर 20  एप्रिलअखेर तालुकास्तरावरील  प्रशिक्षणे पूर्ण करण्याचा  घाट विभागीय मंडळांचा आहे. दरम्यान, शहर व परिसरात नवीन पुस्तके उपलब्ध झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही ती पोहोचलेली नाहीत.

नवीन अभ्यासक्रम बदलला की पाठ्यपुस्तके केव्हा उपलब्ध होणार याबाबत शिक्षक,  विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता असते. यावर्षी  आठवी व दहावीचा सर्व विषयाचा अभ्यासक्रम  बदलणार आहे.नवीन रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे यासाठी पुस्तके बाजारपेठेत वेळेत येणे अपेक्षित असते. दहावीची पुढील शैक्षणिक वर्षाची पुस्तके मार्च महिना संपला तरी अद्यापही बाजारात आली नाहीत.नववीची वार्षिक परीक्षा संपताच दहावीच्या अध्यापनास सुरूवात होते. त्यामुळे पुस्तके वेळेत उपलब्ध झाली तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. गतवर्षी नववीचा अभ्यासक्रम बदलला मात्र शाळा 15 जूनला सुरू झाली तरी पुस्तके बाजारात  आली नव्हती. त्यामुळे शिक्षकांची प्रशिक्षणेही रखडली होती.

नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण 5 एप्रिलपासून राज्यभर सुरू होणार आहेत तर  दि. 20 एप्रिलअखेर तालुकास्तरावरील सर्व शिक्षकांची प्रशिक्षणे पूर्ण करण्याचा विभागीय मंडळाचा मनोदय आहे.मात्र सध्या बाजारात आठवी व दहावीची अद्यापही पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या होणार्‍या प्रशिक्षणाला तरी ही पुस्तके वेळेत उपलब्ध होणार का? असा सवाल शिक्षकांसह विद्यार्थ्यामधून उपस्थित होत आहे.

माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी  लागण्यापूर्वीच 20 एप्रिलअखेर प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. एक पुस्तक संच खरेदी करण्यासाठी सुमारे 625 रुपये लागणार आहेत तर मोफत पाठ्यपुस्तके आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षी शाळेत वाटली जाणार आहेत.

राज्यस्तरीय दहावी प्रशिक्षण वर्गाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे, कंसात तालुकास्तर तारखा - मराठी 5 एप्रिल (9 एप्रिल), इंग्रजी 6 एप्रिल (10 एप्रिल), हिंदी  7 एप्रिल (11 एप्रिल), गणित 9 एप्रिल (12 एप्रिल), विज्ञान व तंत्रज्ञान  10 एप्रिल (13 एप्रिल), इतिहास व राज्यशास्त्र  11 एप्रिल (16 एप्रिल), भूगोल व अर्थशास्त्र  12 एप्रिल (17 एप्रिल), संरक्षणशास्त्र  13 एप्रिल (18 एप्रिल), स्वविकास व कलारसास्वाद 16 एप्रिल (19 एप्रिल), संस्कृत  17 एप्रिल (21 एप्रिल) अशी प्रशिक्षणे होणार आहेत. मात्र पुस्तकेच उपलब्ध नसतील तर प्रशिक्षणे कशी होणार?, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

 

Tags : satara, satara news, student, new books, Curiosity,