Tue, Jun 18, 2019 22:36होमपेज › Satara › धैर्यशील कदमांची दर वाढवण्यासाठी उठाठेव

धैर्यशील कदमांची दर वाढवण्यासाठी उठाठेव

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:14PMकराड : प्रतिनिधी 

धैर्यशील कदम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. भाजपचे नेेते चंद्रकांत पाटील यांच्यासह ना. सदाभाऊ खोत, डॉ. अतुल भोसले यांच्या भेटी घेऊन त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसशी गद्दारी केली आहे. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. त्यामुळे पक्षाची झूल काढून निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान देत केवळ स्वत:चा दर वाढवण्यासाठीच धैर्यशील कदम यांची उठाठेव सुरू असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी केली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आ. आनंदराव पाटील यांनी धैर्यशिल कदम यांच्यावर ही टीका केली. अविनाश नलवडे, अजितराव पाटील - चिखलीकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, धैर्यशिल कदम यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांच्यासारखी मंडळी सातत्याने काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. आपण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगताच एका क्षणात कोणताही विचार न करता राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मी ताम्रपट घेऊन आलेलो नाही, असे सांगूनही वारंवार जिल्हाध्यक्ष पदाबाबत सातत्याने बदनामीकारक विधाने करून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कमीपणा आणण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते निवडणुकीद्वारे जिल्हाध्यक्ष ठरवतील, असे सांगत धैर्यशिल कदम, आ. जयकुमार गोरे यांनी सभासद पुस्तके देऊनही सभासद वाढवले नाहीत, असा दावाही आ. पाटील यांनी यावेळी केला.

तसेच 2009 च्या निवडणुकीवेळी धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर काय देवाणघेवाण झाली? असा प्रश्‍न आ. पाटील यांनी उपस्थित केला. तसेच आता पुन्हा दर वाढवून घेण्यासाठी मी निवडणूक लढवणारच अशी वल्गना आत्तापासूनच केली जात आहे. कोणत्याही स्थितीत कराड उत्तरेत काँग्रेस कार्यकर्ते वरिष्ठांचे आदेश मानत आघाडी धर्मही पाळतील, असे स्पष्ट संकेतही आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत 57 हजार मते मिळाली असे कदम सांगतात. मात्र मलाही 57 हजारांच्याच घरात मते मिळाली होती. कॉँग्रेस कार्यकर्त्यांचीच ही मते आहेत, असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मतांच्या जिवावर उमेदवारीसाठी अन्य पक्षांकडे जोगवा मागितला जात असल्याची बोचरी टीका करण्याचे उद्योग सुरू आहेत. अनेक पक्ष फिरून कॉग्रेसमध्ये यायचे आणि पुढे स्वत:च्या स्वार्थासाठी बेताल वक्तव्ये करायची, हे सहन केले जाणार नाही. ‘बेडूक फुगून बैल होत नाही’ हे लक्षात ठेवा असा उपरोधिक टोला लागवत यापुढे आपण कठोर भूमिका घेणार असल्याचेही आ. आनंदराव पाटील यांनी सांगितले.

शिस्त, आचारसंहिता काँग्रेसमध्ये पाळवीच लागेल 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसने तुम्हाला ताकद दिली. तरीही नेत्यांचे ऐकणार नाही, मी उभा राहणारच, ही भूमिका पक्ष शिस्तीला शोभते का, असा प्रश्‍न करत तुम्हाला लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. पक्षात राहायचे असेल तर शिस्त, आचारसंहिता पाळावीच लागेल, असा सज्जड इशाराही आ. आनंदराव पाटील यांनी धैर्यशील कदम यांना दिला आहे.