Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Satara › कराडात गुंडांनी घेतला पोलिसांचा धसका !

कराडात गुंडांनी घेतला पोलिसांचा धसका !

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:26PMकराड : अमोल चव्हाण

कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार चालविणार्‍या टोळीच्या प्रमुखांसह 14 जणांना पोलिसांनी तडीपार केल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचा गुंडांनी चांगलाच धसका घेतला आहे. शहर व परिसरात 36 व तालुक्यातील 20 अशा एकूण 56 जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पाठविला असल्याने आणखी 42 जणांवर लवकरच तडीपारीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

कराड शहरासह तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालत होते. मटका, दारू, जुगार यासह एकूण अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांना आर्थिक पाठबळ मिळत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कराड शहरासह तालुका पोलिसांनी अवैध धंदे व गुंडगिरीविरोधात मोहिम उघडली आहे. डीवायएसपी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह पोलिसांनी गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याचा धाक निर्माण केला आहे. गुन्हे शाखेने तर अवैध व्यवसायाभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात केल्यामुळे गुंडांची पळापळ सुरु झाली आहे. 

कराड शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे एखादा गुंड पोलिसांच्या हाती लागला की त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण पोलिसांनी राबविले आहे.  

शहर व परिसरात मोठ्याप्रमाणावर मटका व जुगार सुरु होता. त्यामुळे वारंवार त्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. पोलिसांनी मटका, जुगार तसेच एकूणच गुंडगिरीविरोधात कारवाईची मोहिम सुरु केल्यानंतर बहुतांशी ठिकाणचे मटका व जुगाराचे अड्डे बंद झाले. मात्र, यातून काही मटका घेणार्‍यांसह जुगार खेळणार्‍यांनी पळवाट शोधून गावाबाहेर नदीकाठावरील जमीन भाड्याने घेऊन तेथे जुगाराचा अड्डा मांडला होता. 

सध्यस्थितीत 14 जणांवर कारवाई झाली असून अन्य 42 जणांवरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे गुंडांमध्ये खळबळ उडाली असून आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यांची पळापळ सुरू असल्याचे दिसते. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.