होमपेज › Satara › बेकायदा उत्खनन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

बेकायदा उत्खनन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

Published On: Mar 07 2018 6:31PM | Last Updated: Mar 07 2018 6:31PMकराड : प्रतिनिधी 

पाडळी केसे (ता. कराड, जि. सातारा) गावच्या हद्दीत खाणपट्टीवर गौणखनीज उत्खननाची मुदत 2014 साली संपल्यानंतरही डबर उत्खनन करत शासनाची तब्बल दोन लाख 46 हजारांची रॉयलटी बुडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंडलाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रमेश नारायण मोहिते (मलकापूर), अनिल बाळकृष्ण पाटील (वारूंजी), रविंद्र सोपानराव जाधव (कराड), आकाश जयवंत जाधव (सुपने) आणि जनार्दन केशव माने (कापील) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नविंद्र शिवराम भांदिर्गे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, ते सुपने विभागाचे मंडलाधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

पाडळी केसे गावच्या हद्दीत शासकीय गट नंबर 351 मध्ये साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी खाणपट्टा मंजूर केला होता. याची मुदत 2014 सालीच संपुष्टात आली आहे. मात्र, त्यानंतरही अवैधरित्या डबर उत्खनन सुरूच होते. त्यानंतर भांदिर्गे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामे करत त्याचा अहवाल तहसिलदारांना सादर केला होता. त्यानंतर तहसिलदारांनी याप्रकरणी 616 ब्रासचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तसेच पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते.