Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Satara › ‘वाळीत’प्रकरणी पोलिस पाटलासह ४५ जणांवर गुन्हा

‘वाळीत’प्रकरणी पोलिस पाटलासह ४५ जणांवर गुन्हा

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:22PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर 

विवर, ता. महाबळेश्‍वर गावच्या पोलिस पाटलांनी खुनाचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी काही नेतेमंडळींना हाताशी घेऊन विजय विश्‍वनाथ मोरे यांना 5 लाख रूपयांचे आमिष दाखवले. ते या दबावाला बळी न पडल्याने गावाने त्यांना वाळीत टाकले. याप्रकरणी मोरे यांच्या तक्रारीनुसार पोलिस पाटलासह 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय मोरे यांच्या वडिलांचा 14 ऑगस्ट 1999 रोजी खून झाला होता. याप्रकरणी जावई विष्णू भगवान कदम, सुरेश बाबुराव कदम, तुकाराम नवलु कदम, एकनाथ दत्तू कदम यांना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी विष्णु कदम यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर इतर तिघांची निर्दोष म्हणून सुटका केली. निर्दोष सुटलेल्यांच्या विरोधात सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना विष्णू कदम याची 2007 साली जामीनावर मुक्तता झाली. गावचे पोलिस पाटील कृष्णा धोंडीबा कदम यांनी विजय मोरे व त्यांच्या आईंना घरी बोलावून बैठक घेतली. यावेळी आरोपींविरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी पैशाचे अमिष दाखवून दबाव टाकला. यावेळी मोरे यांनी गुन्हा मागे घेण्यास नकार दिला. तेव्हापासून मोरे यांच्या घरावर बहिष्कार टाकला असल्याचे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. गावातील लोकांनी आमच्यासोबत सर्व संबंध तोडले असून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावरून महाबळेश्‍वर पोलिसांनी पोलिस पाटील  कृष्णा कदम यांच्यासह 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.