Thu, Mar 21, 2019 15:44होमपेज › Satara › वळीवाच्या वाकुल्या; बळीराजाला घोर 

वळीवाच्या वाकुल्या; बळीराजाला घोर 

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 7:47PMसातारा : प्रतिनिधी

वाढत्या उन्हाच्या चटक्याने जनजीवन होरपळून गेले असून अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिना अखेरीकडे निघाला असला तरी वळीवाचे आतांड तांडव झालेच नाही. मान्सूनपूर्व पडणारा हा वळीव शेती व पाण्याच्या साठवणुकीसाठी अत्यंत गरजेचा असला तरी यंदा मात्र वळीवाने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. काही अपवाद वगळता वळीवाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसह जनता हवालदिल झाली आहे. वळीवाने वाकुल्या दाखवल्यामुळे बळीराजाला घोर लागला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात हमखास पडणारा वळीव गेल्या दोन-तीन वर्षांत गरजेपुरताच बरसत आहे. ऋतुचक्रातील बदलामुळे वळीवाचा पाऊसही बेभरवशी झाला आहे. मे महिना संपत आला तरीही जिल्ह्यात वळीवाची अपेक्षित बरसात झाली नाही. मध्यंतरी जिल्ह्यात फलटण, खटाव, कोरेगाव, वाई, खंडाळा तालुक्यांत कुठे कुठे वळवाने हजेरी लावली असली तरी पाणीच पाणी काही झालेले नाही. वादळ व विजेमुळे मात्र काही ठिकाणी थरकाप उडाला. 

मे महिना सुरु झाल्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून यंदा पारा 42 अंशांपर्यंत  गेला. गेले काही दिवस हा पारा खाली-वर होत आहे.  आकाशात ढग जमा झाल्यासारखे चित्र अधूनमधून दिसते. त्यामुळे वळीव बरसेल अशी आशा शेतकर्‍यांसह तहानलेल्या जनतेला वाटू लागली. मात्र, ढगाळ हवामान असूनदेखील सायंकाळच्यावेळी सुटणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यामुळे ढग पांगू लागले आहेत. त्यामुळे पावसाचा पत्ता नाही. वळीव न बरसल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे. 

काही वर्षांपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा. त्यामुळे मे महिन्यात तापमानही कमी असायचे. वळीव बरसल्यामुळे शेतकर्‍यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी करता यायची. त्यामुळे मृगाच्या पावसावर पेरण्याही उरकल्या जायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. आधीच शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून वळीव न बरसल्यामुळे खरिपाची पूर्वतयारी कशी करायची? या चिंतेत शेतकरी पडला आहे. त्यामुळे आता सगळा हवाला वळवाचा उरलेला कालावधी व मान्सूनवरच आहे.

हवामान खात्याने यावर्षी मान्सून वेळेत येईल, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. मान्सूनची अंदमान, केरळ अशी वाटचालही सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.