Fri, Nov 16, 2018 12:58होमपेज › Satara › पाटणमध्ये मोबाईल फॅनची निर्मिती 

पाटणमध्ये मोबाईल फॅनची निर्मिती 

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 9:12PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण तालुक्यातील वार्‍याची किमया जगजाहीर आहे. आशिया खंडातील पवन ऊर्जेसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून या भागाने नावलौकिक मिळवला. निसर्ग सौंदर्याचा खजिना असणार्‍या या तालुक्यातील फ्री ऑक्सिजनची किमया स्थानिकांसह देश, विदेशातील पर्यटकांनीही अनुभवली. पाटणने यामध्ये आणखी भर घालत मोबाईल  फॅनचा शोध  येथील युवकांनी लावला आहे. 

ज्या डोंगर पठारांवर साधी कुसळंही उगवत नव्हती अथवा कायमस्वरूपी आदिवासी भाग म्हणून ओळख होती. त्या  ठिकाणी अशिया खंडातील पवन ऊर्जेसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवला. ही किमया साधण्यात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा मोठा वाटा आहे. 
येथे हजारो पवनचक्क्या व अब्जावधींची गुंतवणूक झाली आहे. यातूनच मग स्थानिकांना रोजगार व व्यवसायनिर्मिती झाली. कवडीमोल जमिनींना लाखो रुपयांचा भाव मिळाला. लंगोटीवरच्या माणूस सुटाबुटात आला. 

झोपड्यांची जागा बंगल्यांनी घेतली. डांबरी रस्ते झाले. दारात दुचाकी, चार चाकीही उभी राहिली. दुसर्‍या बाजूला नैसर्गिक व फ्री ऑक्सिजन असणार्‍या येथील वार्‍यामुळे स्थानिकांचे आरोग्य व जीवनमान चांगले राहिले. तर सातत्याने प्रदूषणाचा सामना करावा लागणार्‍या देशी व परदेशी पर्यटकांनाही येथे शुद्ध हवेसाठी यावे लागते. स्वाभाविकच पर्यटन व्यवसाय वाढीस लागला. याच तालुक्यातील युवकांनी आता ऐन उन्हाळ्यात आपले उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मोबाईलवर फॅन जोडून किमया केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात किमान गरज भागविण्याचा प्रयत्न होत आहे.

नुकतेच पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल आंदोलनात अशाच प्रकारे युवक भर उन्हात झालेल्या जाहीर सभेत मोबाईलवर फॅनद्वारे वारे घेत होते. नेत्यांनाही या वार्‍याचा मोह आवरला नाही. त्यांनी युवकाला बोलावून त्याच्या मोबाईलवरील फॅनची मजा घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या वार्‍याचा आनंद लुटला.

Tags :  Creating , Mobile Fan , satara news