Mon, Jun 01, 2020 23:49
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › नव्या पिढीत वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण करा : खा. पवार 

नव्या पिढीत वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण करा : खा. पवार 

Last Updated: Feb 14 2020 10:45PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा
जगात अनेक ठिकाणी हिंडत असताना इंग्लंड, अमेरिका आदी ठिकाणी जातो. अपवाद वगळता गेल्या पन्नास वर्षांत परदेशात कधी सिनेमा, नाटक पाहिलं नाही. या क्षेत्राबद्दल आस्था आहे मात्र त्यासाठी मी कधी वेळ घालवत नाही. जगातील  अनेक देशांमधील उत्तम शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये जाऊन ज्ञान संपादन करण्यासाठी वेळ घालवतो. जग बदलले असून लोकांच्या गरजाही बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ती दृष्टी तयार करणे हे आव्हान आहे. नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन तयार केला पाहिजे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल नामकरण व उद्घाटन सोहळा खा. शरद पवार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात पार पडला.  त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सौ. प्रतिभाताई पवार, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सुभाष शिंदे, रामशेठ ठाकूर, शिवप्रसाद खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांनंतर रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी आयुष्य खर्ची घालत असताना आप्पासाहेब लाभ, प्रसिध्दीपासून दूर राहिले. त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे यासाठी इंग्लिश मिडियम स्कूलला त्यांचे नाव देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लक्ष घातले असून ‘विज्ञान परिषद’ भरवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आस्था निर्माण करणारी ‘रयत’ ही एकमेव शिक्षण संस्था आहे. सातार्‍यात ‘रयत’च्या माध्यमातून सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हीटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. राज्यातील अन्य शाखांमध्येही असे सेंटर सुरु करता येईल का? याचा विचार मॅनेजिंग कौन्सिलने करावा. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, नगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर अशी अनेक ठिकाणे आहेत. या भागात संस्थेला पाठिंबा देणारा घटक आहे.  बदल  व्हावा अशी इच्छा असणारा  हितचिंतकांचा वर्ग असल्याने सातार्‍यात सेंटर सुरु झाले. त्याचा विस्तार काही वर्षांत राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये करुन विज्ञानाबाबतची आस्था नव्या पिढीत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

डॉ. अनिल काकोडकर म्हणाले,  भारताला सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष देवून त्याठिकाणी विज्ञानावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांची जिज्ञासापूर्वी होणे गरजेचे आहे. ज्ञानाची नवीन क्षेत्रे निर्माण होण्यासाठी तज्ञ मंडळी देशात निर्माण झाली पाहिजे. विज्ञानविषयक वातावरण निर्माण झाले तर लवकरच क्रांती घडेल.  डॉ. अनिल पाटील म्हणाले, भविष्यातील पन्नास वर्षांचा विचार करुन संस्थेची वाटचाल सुरु आहे. विज्ञान, गणित आणि संभाषण कौशल्यावर भर देवून नव्या अभ्यासक्रमाचा अवलंब करावा लागेल. संस्थेतील 23 मुलांनी पेटंटसाठी अर्ज केले आहेत. 200 हायस्कूल्समध्ये अटल रिंकरिंग लॅब उभ्या केल्या असून संस्थेच्या माध्यमातून 105 ठिकाणी अशा लॅब सुरु केल्या. 23 महाविद्यालयांनी नॅकची ए ग्रेड मिळवल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.