Sun, Mar 24, 2019 08:33होमपेज › Satara › लोणंदमध्ये क्रेन चालकाचा खून

लोणंदमध्ये क्रेन चालकाचा खून

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 10:57PMलोणंद : प्रतिनिधी 

जुन्या भांडणाच्या कारणातून शिरवळ-लोणंद रस्त्यावरील दगडे बिल्डिंग येथे  क्रेन चालक चंद्रकांत अंकुश साळुंखे (वय 35, सध्या रा. लोणंद एमआयडीसी शेळके  वस्ती, लोणंद, ता. खंडाळा, मूळ रा. कोर्‍हाळे पेशवे वस्ती, ता. बारामती) यांचा शनिवारी रात्री डोक्यात दगड घालून व गळा चिरून खून केला. अवघ्या काही तासामध्ये लोणंद पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला  ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ-लोणंद रस्त्यापासून एमआयडीसी थोड्याच अंतरावर आहे. या परिसरात दगडे बिल्डिंग आहे. या ठिकाणी चंद्रकांत साळुंखे यांचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून व गळा चिरून खून केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर जालिंदर जयसिंग खलाटे (रा. खुंटे, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अभिजित पाटील, स.पो.नि. सोमनाथ लांडे, गिरीश दिघावकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार बी जी वाघमारे व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाच्या अनुषंगाने श्‍वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. यानंतर डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान एमआयडीसीतीलच एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या रागातून आपणच चंद्रकांत यांची हत्या केल्याचे कबुल केले. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार करत आहेत. फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या काही तासातच संशयिताला अटक केल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्‍त केले जात आहे.