Wed, Nov 14, 2018 16:41



होमपेज › Satara › झाडे लावण्यावरून चुलत भावाचा खून

झाडे लावण्यावरून चुलत भावाचा खून

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:23PM



फलटण : प्रतिनिधी

वडले, ता. फलटण येथील शेतात झाडे लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सख्ख्या चुलत भावांनी आपल्याच चुलत भावाचा खून केल्याची घटना रविवारी घडली. बाळकृष्ण विठ्ठल सोनवलकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 6 जणांवर ग्रामीण पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कांताबाई बाळकृष्ण सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती बाळकृष्ण विट्ठल सोनवलकर (वय 35) हे घराशेजारील झाडाखाली दि.3 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान झाडांसाठी खड्डे काढत होते. यावेळी खड्डे काढत असताना चुलत भावांसोबत त्यांचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले.

यावेळी  त्यांचे चुलत भाऊ गणेश दशरथ सोनवलकर, दत्तू दशरथ सोनवलकर, शिवाजी दशरथ सोनवलकर, चुलत जाऊ वैशाली दत्तू सोनवलकर, स्वाती शिवाजी सोनवलकर, रेश्मा गणेश सोनवलकर (सर्व रा .वडले ता. फलटण) यांनी केलेल्या मारहाणीत बाळकृष्ण सोनवलकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर वडले गावात एकच खळबळ उडाली आहे.