होमपेज › Satara › केडंबेत दाम्पत्याचा बुडून मृत्यू

केडंबेत दाम्पत्याचा बुडून मृत्यू

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:37PMकेडंबे : वार्ताहर

केडंबे (ता. जावली) येथे बौद्ध वस्तीत असणार्‍या सार्वजनिक विहिरीजवळ म्हशीला पाणी पाजत असताना विहिरीच्या कडेवरून पाय घसरल्याने नंदा सुरेश गायकवाड (वय 39) या विहिरीत पडल्या. त्यांच्याच शेजारी असणारे त्यांचे पती सुरेश काशिनाथ गायकवाड (वय 45)  यांनी नंदा यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र, दुर्दैवाने या दोघांनाही पोहता येत नसल्याने आणि आरडाओरडा केल्यानंतरही कोणी वाचवायला न आल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाला. 

बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास नंदा गायकवाड या आपल्या म्हशीला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती सुरेश हेसुद्धा होते. रहाटाद्वारे बादलीने पाणी काढून त्या म्हैशीला पाणी पाजत होता. त्याचवेळी विहिरीच्या कडेला असणार्‍या शेवाळावरून त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. नंदा यांना वाचवण्यासाठी पती सुरेश यांनीही विहिरीत उडी मारली. यानंतर पाण्यात पडल्यानंतर दोघांनी जीवाच्या आकांताने आवाज केला. मात्र, त्यावेळी विहिरीजवळ कोणीच नव्हते. त्यानंतर परिसरातील एका व्यक्‍तिला विहिरीतून काहीतरी आवाज आल्याचा भास झाला. त्यानंतर त्याने विहिरीत पाहिले असता त्यांना नंदा यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. 

घटनेनंतर काही वेळाने नंदा यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मात्र, सुरेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या अनिल केळगणे, निलेश बावडेकर, सनी बावडेकर, ओंकार नाविलकर, वैभव पार्टे, राहुल बावडेकर, संजय बावडेकर, सुनील वाडकर, सुनील केळगणे या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी नंदा गायकवाड यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. याबाबत रात्री उशिरा मेढा पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद  झाली आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे.