Wed, Jun 26, 2019 17:58होमपेज › Satara › कृत्रिम तळ्यांत २४ लाखांचा भ्रष्टाचार

कृत्रिम तळ्यांत २४ लाखांचा भ्रष्टाचार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात खोदलेल्या कृत्रिम तळ्यांच्या कामात सुमारे 25 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. बांधकाम विभागाकडून या कामावर 7 लाख 78 हजार 850 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, खजिना विभागातून मात्र या कामासाठी सुमारे 32 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. या कामाच्या खर्चात फरक निघत असल्याने  सुमारे 24 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.

सातार्‍यातील वैयक्‍तिक तळ्यांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात बंदी करण्यात आली. त्यामुळे सातारा नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तळे खोदण्यास सुरुवात केली. नगरपालिकेच्या बांधकाम विभागातून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दगडी शाळा (सदरबझार), हुतात्मा स्मारक (सुभाषचंद्र बोस चौक), कल्याणी शाळा परिसर (गोडोली) याठिकाणीही कृत्रिम तळी काढण्यात आली. या कामासाठी यांत्रिक विभागाला 1 लाख 84 हजार रुपये देण्यात आले.  जि.प.च्या प्रतापसिंह शेती शाळेच्या परिसरातही कृत्रिम तळे खोदण्यात आले.  जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांनी सुचवल्यानुसार या तळ्याच्या खुदाईचे काम जानुबाई मजूर सहकारी संस्था, वनगळ (ता. सातारा) यांना देण्यात आले.

ही संस्थाही पालिकेतील एका सभापतीशी संबंधित असल्याचे समजते. तळ्याचे दोन टप्प्यात काम झाले. दक्षिण बाजूसाठी 2 लाख 95 हजार 800 रुपये तर उत्‍तर बाजू खोदकामासाठी 2 लाख 99 हजार  खर्च करण्यात आले.  मात्र, खजिना विभागातून मिळालेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. या तळ्यांच्या कामासाठी सुमारे 32 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. दोन्ही विभागांमधील माहिती एकत्रित केली तर तब्बल 24 लाख 21 हजार 150 रुपयांचा मेळ लागत नाही. त्यामुळे याकामात लाखोंचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे.  शेती शाळेतील तळे मुजवण्यासाठी पुन्हा लाखो रुपये मंजूर केले जाणार असून शाळेच्या कंपाऊंडचे 1 लाख 35 हजाराचे काम लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. सातार्‍यात कृत्रिम तळ्यांच्या कामात दोन वर्षांत कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. ठेकेदाराकडून कामे निकृष्ट होत असल्याने दोन महिन्यांतच मूर्ती उघड्यावर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.