Mon, Apr 22, 2019 06:03होमपेज › Satara › 134 चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल

134 चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 10:56PMसातारा : प्रतिनिधी

माण, खटाव आणि फलटण येथे  मागील दुष्काळात उभ्या केलेल्या 140 चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले असून जिल्हा महसूल विभागाने 134 चारा छावणीचालकांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये बड्यांचा समावेश असून त्यांच्यावरील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

दुष्काळ आवडे सर्वांना, या उक्‍तीचा अनुभव दरवर्षी  दुष्काळग्रस्तांना येत असतो. टँकरमाफियांबरोबरच चारा छावणीचालकांनीही त्यावेळी वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. मागील दुष्काळात संबंधित तालुक्यांतील पशुधन वाचावे आणि शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, यासाठी शेकडो जनावरे दाखल असलेल्या सुमारे 156 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. या चारा छावण्यांना चारा छावणीचालकांमार्फत ओला व सुका चारा, पेंड, मिनरल मिक्‍चर, औषधे, पाणी तसेच पशुवैद्यकीय अधिकारीही उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र, जनावरांच्या बोगस नोंदी करुन त्यावर येणारे अनुदान लाटण्यासाठी काही छावणीचालकांनी प्रयत्न केला. शिवाय जनावरांना देण्यात येणारा ओला व सुका चारा, पेंड, मिनरल मिक्‍चर, औषधे यातही हाणले.

चारा छावण्यांत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला त्यावेळी दै. ‘पुढारी’ने वाचा फोडली. त्याची गंभीर दखल तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. एन्. रामास्वामी यांनी घेतली. त्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले. पुरवठा विभागाने चौकशी केल्यावर आढळलेल्या दोषी चारा छावणीचालकांकडून  देय असलेल्या रक्‍कमेतून लाखोंचा दंड वसूल केला. हे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.  हाय कोर्टानेही गंभीर दखल घेवून राज्य शासनाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित चारा छावणीचालकांवर कारवाई सुरु झाली. माण, खटाव तसेच फलटण तालुक्यांतील संबंधित पोलिस ठाण्यात मंडलाधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या पंधरा दिवसांपासून चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते. आठ दिवसांपूर्वी 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक गावांतील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायट्याही या प्रकरणात गुंतल्या आहेत. सामाजिक संस्थांबरोबरच फौंडेशनवरही गुन्हे दाखल झाले आहेत.

काही सहकारी बँका, पतसंस्थांचाही यामध्ये समावेश आहे. दबावाला बळी न पडता राजकीय पदाधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल केले जात असल्याने बड्यांचे धाबे दणाणले आहेत.  जिल्हा महसूल विभागाने आतापर्यंत 134 जणांवर गुन्हे दाखल केले असले तरी 9 जणांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.