Tue, May 21, 2019 22:35होमपेज › Satara ›

स्वीकृत नगरसेवकपदी साळुंखे, पावशे
 

Published On: Apr 05 2018 12:22AM | Last Updated: Apr 05 2018 12:22AMस्वीकृत नगरसेवकपदी साळुंखे, पावशे
 

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सातारा विकास आघाडीतून सागर साळुंखे यांची, तर भारतीय जनता पक्षाकडून सागर पावशे यांची बिनविरोध निवड झाली. सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी दोघांची नावे जाहीर केली.

साविआ तसेच भाजपच्या दोन स्वीकृत नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने रिक्‍त जागांसाठी पुन्हा निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यानुसार सातारा प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी स्वीकृत नगरसेवकपदांसाठी     
प्राप्‍त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करुन त्याची एक प्रत सातारा नगरपालिकेला पाठवली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी  पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी कोरमची आवश्यकता  नसल्याचे  स्पष्ट करुन सौ. माधवी कदम यांनी  पुढील कामकाज चालवण्याचे निर्देश सभा सचिव राजेश काळे यांना दिले. काळेंनी अटी, नियम स्पष्ट करत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर नगराध्यक्षांनी सागर साळुंखे तसेच सागर पावशे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर पदाधिकार्‍यांनी दोघांचेही बुके देवून अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या प्रेक्षागॅलरीत प्रचंड गर्दी केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत सायंकाळी साळुंखे तसेच पावशे यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.नविआ नगरसेवकांची सभेकडे पाठ

सातारा नगरपालिकेच्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी नगर विकास आघाडीचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.  साविआ तसेच भाजप  स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार असल्याने या  सभेला न येणेच नविआने पसंत केले. सातारा विकास आघाडीचेही बरेच नगरसेवक गैरहजर होते. इतरवेळी नगरसेवकांच्या उपस्थितीने खचाखच दिसणारे सभागृह आज मात्र बर्‍यापैकी रिकामे होते. दुपारी उशिरा झालेली सभा पाच-सात मिनिटांत आटोपली. मात्र, तरीही काही नगरसेवक  सभेसाठी येतच होते. 

Tags : Satara, Corporator, election, Satara