Wed, Apr 01, 2020 09:13होमपेज › Satara › जिल्ह्यात कोरोनाचे आठ संशयित

जिल्ह्यात कोरोनाचे आठ संशयित

Last Updated: Mar 25 2020 10:10PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा
अबुधाबी व कॅलिफोर्निया येथून आलेल्या तिघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, बुधवारी एकाच वेळी 8 जण संशयित विलगीकरण कक्षात दाखल झाले असून त्यापैकी 7 जण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील  आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या द़ृष्टीने सद्यःस्थितीतील दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या 2 वर स्थिर आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका, दुबई, सौदी अरेबिया, बहामा, अबुधाबी, कॅलिफोर्निया येथून परदेशवारी करणार्‍या कोरोना संशयितांची तपासणी सिव्हिलमध्ये दररोज केली जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने परदेशवारी केलेले आणि परजिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांचा सर्व्हे सुरू आहे. अशा लोकांच्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दरम्यान, परदेशवारी करून आलेल्यांपैकी 2 जण कोरोनाने बाधित आहेत. त्यांच्या संख्येत वाढ झाली नसली तरी संशयित म्हणून दाखल होणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.  

अबुधाबी आणि कॅलिफॉर्नियातून प्रवास करून आलेल्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात बुधवारी 8 संशयितांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 7 जण परदेशवारी करून आलेल्या लोकांच्या संपर्कातील आहेत. या सर्वांची सिव्हिलमध्ये तपासणी केल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे घशातील स्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा सध्या कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यावर आहे. बुधवारी दाखल झालेल्या 8 संशयितांपैकी एक वृद्ध महिला ग्रामीण भागातील असून तिचा थेट परदेशवारी केलेल्या लोकांशी संपर्क आलेला नाही. या वृद्धेचा रिपोर्ट काय येतोय, यावर पुढील बर्‍याच बाबी अवलंबून असणार आहेत.