कोरोना आलाय नाक्यावर..!

Last Updated: Mar 29 2020 10:36PM
Responsive image


कोरोना आमचं काही वाकडं करु शकत नाही.. भारतात कडक उन आहे. कोरोनाचा विषाणू इथं जगूच शकत नाही...असे खूप महामारीचे रोग आम्ही भारतात पाहिले आहेत. कोरोना दिल्लीत आहे... मुंबईत आहे, पुण्यात आहे. आमच्या जिल्ह्यात.. आमच्या गावात येऊ शकत नाही, असे म्हणत कोरोनावर जोक करुन बेपर्वाईने वागणार्‍या सातारकरांनो... कराडकरांनो कोरोना आता आपल्या जिल्ह्याच्या वेशीवर येऊन थांबला आहे नव्हे सातारा जिल्ह्यात सुद्धा आला आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यापासून केवळ 20 किलोमीटरवर असलेल्या वाळवा तालुक्यात येऊन थांबला आहे. होय... कोरोना आता आपल्या घराजवळ येऊन थांबला आहे. आता काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची वेळ आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे भारतात कोरोना कमी वेगाने पसरत असला तरी लवकरच तिसरी स्टेज आली तर कोणीच त्याला रोखू शकणार नाही. मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या आवाहनाला हरताळ फासून आम्ही लोक कोरोनावर जोक करत बसलो आहोत. कोरोनामुळे आपलं काही बिघडणार नाही या अविर्भावात आम्ही बिनधास्तपणे चौका-चौकांत गर्दी करुन थापा ठोकत आहे. व्हिडीओ तयार करीत आहेत. हा शुद्ध मुर्खपणा आहे. चीन, इटली, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांनासुद्धा कोरोनावर उपचार करुन प्रतिबंध करता आला नाही. इथे भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असणार्‍या देशाला कसे बरे जमेल? तरीही खबरदारी घेण्याचे काम सरकारने केले आहे. अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. आजपर्यंत कधीही घेतले नाहीत असे देशव्यापी बंदचे.. लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूसारखे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. हे निर्णय सरकारला काही तरी करुन दाखवायचे आहे म्हणून घेतले नसून भारत देशाला कोरोनाच्या महासंकटापासून वाचविण्यासाठी घेतले आहेत. तरीही काही लोक याला वेगळाच रंग देऊन आम्हाला याच्याशीकाही देणं-घेणं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्या-मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचे आकडे वाचन करत कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी आदी विषयांवर भरपूर प्रबोधन झाले आहे. हात-पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश दिला जात नव्हता, या भारतीय संस्कृतीचा कित्ता आता अनेकजण गिरवू लागले आहेत. मात्र केवळ हात-पाय धुवून किंवा मास्क तोंडाला लावून कोरोना थांबणार नाही. हे लोकांना अजूनही पटत नव्हते. कारण सातारा जिल्ह्यात किंवा कराड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र कराडच्या शिवेपासून काही अंतरावर असलेल्या वाळवा तालुक्यात कोरोनाचे आत्तापर्यंत 23 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर सातारा जिल्ह्यातही दोन रुग्ण आढळले आहेत. आता धोका वाढला आहे. कराडपासून जवळ असणार्‍या वाळवा तालुक्यातून कराड शहरात फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित काही रुग्ण वाळवा तालुक्यातून कराड तालुक्यात आलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी मनुष्यबळ असूनही महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा कोरोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मात्र वेेंंधळी जनता अजूनही या संकटाबाबत अजूनही तितकी सिरीयस झालेली दिसत नाही. संचारबंदीचा अर्थही लोकांना समजत नाही. विशेषतः कराड शहरातील जनता कोरोनाबाबत काळजी घेताना दिसत नाही. याउलट जनता कर्फ्यूनंतर सलग दोन दिवस कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांनी आजही स्वयंस्फूर्तीने गावांतील व्यवहार बंद ठेवून स्वतःला घरामध्ये, गावामध्ये कोंडून घेतले आहे. मात्र शहरातील लोकांना असे काय काम येऊन पडले आहे? ज्यामुळे त्यांना रोज बाहेर पडावे लागत आहे. शहरातील सर्व उद्योगधंदे, दुकाने, हॉटेल बंद आहेत. तरीही चौका-चौकात उडाणटप्पू युवक गर्दी करत आहेत. किराणा मालाच्या दुकानात तंबाखुच्या पुडीसाठी गर्दी करत आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यू यापेक्षा तंबाखू खायला मिळाली नाही तर माझे कसे होणार? या विवंचनेत शहराजत काही ठिकाणी मागच्या दाराने पान, तंबाखू, गुटखा विक्री सुरु आहे. हे निश्‍चितच संतापजनक आहे. शहराच्या तुलनेत गावाकडचे लोक शहाणे म्हणण्याची वेळ आता आली आहे. 

राज्यभर कोरोनाला तोंड देण्यासाठी 144 कलम लागू केले आहे. मात्र रस्त्यावर, चौकात काही काम नसताना होणारी गर्दी, क्रिकेटचा डाव हे पाहिले तर शिक्षणाचा आणि अक्‍कलेचा काहीही संबंध नाही असेच म्हणावे लागेल. इटली, स्पेन, इंग्लंडमधून महाराष्ट्रातील अनेक नोकरदारांनी आपले अनुभव फेसबुकवर शेअर केले आहेत. आम्ही आतापर्यंत जिवंत राहिलो ते केवळ घरात थांबल्यामुळेच.. असे ते जीव तोडून सांगत आहेत. मात्र तरीही लोक हे मनावर घेत नाहीत. जर तुम्ही घरात बसला तर कोरोना कधीही तुमच्या मागे येणार नाही हे त्रिवार सत्य आहे. मात्र उंडारकी करण्यासाठी बाहेर पडलात आणि एखाद्या ठिकाणी कोरोनाग्रस्त व्यक्‍तीच्या, वस्तुच्या सानिध्यात आला तर कोरोना तुमच्या शरीरात नक्‍की प्रवेश करणार आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर हळू-हळू श्‍वसननलिका आणि फुफ्फुसावर हल्ला करतो आणि त्यामुळे उपचारासाठी रुग्णाला व्हेंटिलेटरवरती ठेवले जाते. आज रोजी सातारा जिल्ह्यात 125 च्या घरात व्हेंटीलेटर आहेत. कोरोनाने सातारा जिल्ह्यात पाय पसरले तर हे व्हेंटीलेटर कोणाला पुरणार आहेत.? जिल्हावासियांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन जीव तोडून काम करीत आहे. आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही कोरोना होऊ शकतो.. याची शक्यता असूनही पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील कराडमध्ये उपअधिक्षक सूरज गुरव, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिस यंत्रणा काम करीत आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याची गरज आहे. कोरोना सातारा, कराडच्या नाक्यावर येऊन थांबला आहे. घरात बसून राहणे आणि कोरोनाला रोखणे हे देशभक्‍तीचे कार्य आहे. कधी नव्हे ते घरात बसून देशसेवा करण्याची संधी आम्हाला आली आहे. त्यामुळे आता स्वतः जगण्यासाठी...कुटुंबाला जगविण्यासाठी... राज्याला आणि देशाला वाचविण्यासाठी घरात बसणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. असे आणि असेच केले तरच आपण वाचू शकणार आहोत. ‘गो.. कोरोना गो..’ असे म्हणून कोरोना जाणार नाही. मात्र आपण घराबाहेर न पडल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कोरोना नक्‍कीच जाणार आहे. नाक्यावर आलेल्या कोरोनाला आपल्या गावात, शहरात प्रवेश करु न देण्यासाठी 
        चला...प्रशासनाला पूर्णपणे 
        सहकार्य करुया...घरात बसुया... 
        मुला-बाळांना वेळ देऊया...!articleId: "185532", img: "Article image URL", tags: "satara, satara news, Corona, came, circle ",