Thu, Jun 27, 2019 18:02होमपेज › Satara › कृषी कामासाठी आता ठेकेदारी

कृषी कामासाठी आता ठेकेदारी

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 9:31PM

बुकमार्क करा

सातारा : प्रवीण शिंगटे

कृषी क्षेत्रामध्ये मजुरांची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून शेतीमधील कामांसाठी शेतमजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतीची वेगवेगळी कामे वेळेत होत नाहीत, परिणामी कृषी उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. तसेच कुटुंब विभाजनामुळे शेती क्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे शेतीभांडवल व मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ घेतल्यास  शेतीमध्ये गुंतवणूक करणे शेतकर्‍यांना परवडत नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कृषी विषयक कामे दराने करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतीसाठी लागणारी विविध कृषी औजारे, ट्रॅक्टर, इतर प्रक्रिया यंत्र इत्यादीसाठी शेतकर्‍यांना इतर शेतकरी  अन्य नागरिकांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर मजुरीसाठी जादा दर द्यावा लागतो. बहुतांश  शेतकर्‍यांना  मोठी कृषी औजारे, उपकरणे स्वत:साठी खरेदी करण्याच्या मर्यादा पडत असतात.  शेतीमधील मजुरांच्या व सेवा सुविधांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी  शेतकर्‍यांना सध्याच्या भाडेदरापेक्षा कमी दराने शेतीमधील विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी बेरोजगार कृषी पदवीधरांच्या गटास सेवा पुरवठादार म्हणून नेमण्यात येणार आहे. 

सेवा पुरवठादारास विविध कृषी औजारासाठी जिल्हा परिषद सेसनिधीमधून अर्थसहाय्य देण्याची नावीन्यपूर्ण योजना  राबवण्यासंदर्भात कृषी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

शेतकर्‍यांना  सध्याच्या भाड्यापेक्षा कमी दराने शेतीविषयक सेवा उपलब्ध करून देणे, पिकाच्या पेरणीपासून काढणीपश्‍चात प्राथमिक प्रक्रियेपर्यंत यांत्रिकीकरणाची भाडेतत्वावर सेवा शेतकर्‍यांना  उपलब्ध करणे, बेरोजगार कृषी पदवीधारकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे व गटास सेवा पुरवठादार म्हणून घोषित करणे व त्यास विविध औजारांच्या भांडवली खर्चासाठी अर्थसाहाय्य करणे,  सेवा  पुरवठादाराच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या  विविध समस्यांचे निराकरण करणे, पिक संरक्षण फवारणीसारख्या कामामध्ये अज्ञानी शेतकर्‍यांच्या  जिवाची जोखीम कमी करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात  एका सेवा पुरवठादार गटाची निवड सन 2017 व 18 मध्ये करण्यात येणार आहे. या गटात किमान 10 सदस्य असावेत त्यापैकी किमान दोन सदस्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कृषी पदवीधर व उर्वरीत सदस्य कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व सदस्य बेरोजगार असणे आवश्यक आहे.सदस्यांनी शेतकर्‍यांना  सध्याच्या दरापेक्षा कमी दरात कृषी सेवा पुरवणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील सेवा पुरवठादारांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील व कृषी विकास अधिकारी  डॉ. चांगदेव  बागल यांनी केले आहे.