Tue, Jan 22, 2019 22:09होमपेज › Satara › मागण्यांसाठी अपंगांचे साखळी उपोषण सुरू

मागण्यांसाठी अपंगांचे साखळी उपोषण सुरू

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 11:42PMसातारा : प्रतिनिधी

भाजप सरकारकडून इतर बांधवांच्या मागण्या लगेच मान्य केल्या जातात. त्यांना योजनाचाही लाभ लगेच भेटतो पण अपंग असणार्‍या लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून प्रश्‍न सोडविण्यास कुचकामी ठरत असल्याने राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारकडून समाजातील लोकांना विविध योजना दिल्या जातात. परंतु सरकारकडून अपंग बांधवांवर अन्याय केला जात आहे. अपंगांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सरकारच्या अपंग व निराधार योजनेची पेन्शन 4 महिने मिळाली नाही आणि वाढलीही नाही ती त्वरित मिळावी, अंत्योदय योजनेतील धान्य व रॉकेल 8 महिन्यांपासून मिळाले नाही, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकामधील 5 टक्के अपंगांसाठीच्या निधीचे वाटप 90 टक्के अपंगांना मिळाले नाही, अपंगांना 50 टक्के मिळकतकरांमध्ये कुटुंब प्रमुखांना अट न लावता घरफळा माफ करावा, अपंग वित्त व विकास महामंडळाचा कारभार कोणत्या महामंडळाकडे वर्ग केला आहे हे जाहीर करावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अपंग विकास 
महासंघ  मुंबई, सातारा जिल्हातील अपंग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत.

या साखळी उपोषणास राज्य संचालक सुरेश इंगवले, जिल्हासचिव आकाश पवार, तालुकाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, कराड तालुकाध्यक्ष सिद्धनाथ शेटे, सतीश भोसले, जिल्हा उपकार्याध्यक्षा एकता कदम, विद्या कारंडे, शालन नेरे यासह इतर अपंग समाजातील लोकांचा समावेश आहे.