Thu, Feb 21, 2019 03:05होमपेज › Satara › जीर्ण नोटांच्या वापराने ग्राहक झालेत त्रस्त

जीर्ण नोटांच्या वापराने ग्राहक झालेत त्रस्त

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 7:46PMऔंध : वार्ताहर

नोटबंदीनंतर बाजारपेठांमध्ये अनेक चढउतार पाहावयास मिळाले. अनेक ठिकाणी नवीन दोनशे, पन्नास, दहा, वीसच्या नोटा चलनात न आल्याने ग्रामीण भागात नागरिक, ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जुन्या जीर्ण झालेल्या नोटा अनेक बँकांमधून ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. 

नोटाबंदी होऊन जवळजवळ सव्वा वर्ष होत आले आहे. पण, बाजारपेठांमध्ये चांगल्या नोटांचा ठणठणाट जाणवत आहे. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी नंतर दोन हजार, पाचशेच्या नव्या नोटा आल्या  त्या नोटा मोठ्या प्रमाणात आल्या पण त्यानंतर तुरळक प्रमाणात दोनशेच्या नोटा  चलनात आल्या. त्या नोटा ग्रामीण भागात  पोहोचल्या नाहीत. त्याचबरोबर नवीन दहा, पन्नास व वीस रुपयांच्या नोटाही न आल्याने अनेक ठिकाणी जुन्याच दहा, पन्नासच्या नोटांवर व्यवहार सुरू आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये असणार्‍या या नोटा मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याचे आढळत आहेत तर बँकांकडेही शिलकीत असणार्‍या जुन्याच नोटा चलनात आणण्यावाचून गत्यंतर नसल्याने  अनेक ठिकाणी ग्राहक व कर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. 

रिझर्व्ह बँकेने याबाबत त्वरित कार्यवाही करून नव्या दहा,पन्नास व वीसच्या नोटा चलनात आणाव्यात व नंतर जुन्या खराब व जीर्ण झालेल्या नोटा चलनातून काढून टाकाव्यात, अशी मागणी व्यापारी, ग्राहक वर्गातून केली जात आहे.