Thu, Jul 18, 2019 06:12होमपेज › Satara › व्यापारी पैसे मोजून घेतो, आपणही माल पारखून घ्या

व्यापारी पैसे मोजून घेतो, आपणही माल पारखून घ्या

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 13 2018 11:00PMसातारा : दीपक देशमुख 

ग्राहक आणि व्यापार्‍यांचे नाते तसे व्यवहारिकच. परंतु, जसा व्यापारी पैसे मोजून घेतो, तसे ग्राहक माल पारखून घेतोच, असे नाही. माल खराब लागल्यानंतर मात्र अनेकदा ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो. अशावेळी एखादं खमकं गिर्‍हाईक असेल तरच व्यापारी वरमतो, अन्यथा मात्र, दिलेला माल मुकाट्याने पिशवीत घालून नेणारीही गिर्‍हाईक नशीबालाच दोष देतात. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे असले तरी ग्राहकराजा अजूनही जागरूक नसल्यामुळे बर्‍याचदा फसवणूक होत असल्याचे दिसून येते. 

व्यवसायिकांकडून फसवले जावू नये, यासाठी ग्राहक संरक्षण कायदे असले तरी ग्राहकांनी खरेदीच्यावेळी सावधगिरी बाळगून सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्राहक हक्क कायदा हा 35 वर्षापूर्वी अस्थित्वात आला आहे.  त्या कायद्यान्वये कुठल्याच ग्राहकाला व्यवसायिक किंवा दुकानदार फसवू शकत नाही. जर फसवणूक झाली तर दंड होऊ शकतो. त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता येवू लागली आहे.

ऑनलाईन व्यवहारामुळे फसवणूकीचे वाढते प्रकार ग्राहकांची चिंता वाढवणारे आहेत. ऑनलाईन व्यवसायामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती किती सुरक्षित आहे, हे पाहणेही गरजेचे आहे. अनेकदा संस्था अथवा कंपनीचे नाव घेवून एखादा भामटा ग्राहकाला लुबाडून गेल्यावर संबंधित कंपन्यांचे व्यवस्थापनानांनी ग्राहकाला योग्य ते सहकार्य करण्याची गरज आहे.  तसेच ग्राहकांनी फसवणूक होवू नये, याबाबत सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी ’रेरा’ ही महत्त्वपूर्ण कायदा आहे. तथापि, ज्या बिल्डरांनी आपले प्रकल्प रेराकडे नोंदणी केलेले आहेत, अशा प्रकल्पातील फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल सध्या ’रेरा’कडून घेतली जात आहे. जे प्रकल्प रेराकडे नोंदणी झालेले नाहीत त्यांच्या तक्रारी रेराकडे पडून असल्याचे दिसून येत आहे. 

याबरोबरच पेट्रोल भरतानाही अनेकदा घाई-गडबडीत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येते. तसेच अनेक डॉक्टर अद्यापही दवाखान्यात दरपत्रक लावत नाहीत. त्याबाबत कोणीही रुग्ण तक्रार करत नाहीत की आक्षेप घेत नाहीत. याबरोबरच कापड दुकाने, सोन्या-चांदीचे दागिने, हॉटेल्स तसेच अशा अनेक ठिकाणी होणार्‍या आर्थिक उलाढालींचा ग्राहक हाच मुख्य पाया असतो. बाजारपेठेचा ग्राहक हाच राजा असतो. त्याने आपल्या हक्काबाबत जागरूक राहून फसवणूक टाळण्याची गरज आहे.