Tue, Apr 23, 2019 18:05होमपेज › Satara › कृत्रिम तळ्यांत दीड कोटींचे ‘विसर्जन’

कृत्रिम तळ्यांत दीड कोटींचे ‘विसर्जन’

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:54PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात कृत्रिम तळी व त्यानुषंगाने करण्यात येणार्‍या उपाययोजनांवर तीन वर्षांत सुमारे दीड कोटींचे ‘विसर्जन’ केले. पहिल्याच वर्षी 52 लाखांहून अधिक उधळपट्टी झाली. नगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या वारेमाप  खर्चाची  चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

सातारा पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत गणेश मंडळांची बाजू काही ज्येष्ठ नगरसेवकांनी उचलून धरून कृत्रिम तळ्यांना प्रखर विरोध केला होता. वेगळा खर्च करण्यापेक्षा जुनीच तळी स्वच्छ करण्याचा पर्याय त्यावेळी समोर ठेवला होता. मात्र, त्यानंतर सार्वजनिक तळ्यांमध्ये विसर्जनास बंदी घालण्यात  आल्याने सातार्‍यात कृत्रिम तळ्यांच्या खोदकामास सुरुवात झाली. 

मूर्ती विसर्जनासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनांवर दाखवलेला खर्च अवास्तव असल्याचे दिसून आले आहे. पहिल्या वर्षी पालिकेने गणेशोत्सवाच्या नावाखाली सुमारे 52 लाख रुपये खर्च केला. प्रत्यक्ष काम आणि खर्चातील तफावतीवरुन पालिकेच्या कारभारावर टीका झाली. पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या वर्षी  सुमारे 35 लाख खर्च केला. यावर्षी 32 लाख गणेशोत्सवावर खर्च झाले. पहिल्या वर्षाची तुलना तिसर्‍या वर्षी झालेल्या खर्चाशी केली तर तब्बल 20 लाख रुपये खर्च पूर्वी जादा झाला. केवळ पदाधिकार्‍यांच्या खाबूगिरीवर टीकेची झोड उठल्यामुळे हे घडलं. प्रतापसिंह सेंद्रिय शेती शाळेत खोदलेले तळे सूचना करुनही तीन महिने न मुजवणार्‍या नगरपालिकेने तळ्यांना एका दिवसात मुठमाती दिली. त्यावरुन कृत्रिम तळ्यांच्या कामात मोठा झोल झाल्याची शक्यता दुणावली आहे.

कृत्रिम तळी झालीत चरण्याचे कुरण

तळे खोदणे, खोदताना लागलेले पाणी उपसणे,  कागद अंथरणे,  तळ्यात पाणी भरणे, लाईट, लाईफगार्ड, स्पीकर  हे एकाच कामाशी निगडित आहे. तरीही याकामी मजूर सोसायट्यांच्या नावाखाली स्वतंत्र टेंडर देण्यात आली. रस्त्याची कामे करताना डांबर, मोठी खडी, ग्रीट, रोलर  यांचे स्वतंत्र ठेके काढता का? मग तळ्यांच्या कामात असे का? ई टेंडर करायला लागू नये यासाठी कामाचे छोटे-छोटे तुकडे पाडले. कृत्रिम तळी काहीजणांच्या चरण्याचे कुरण झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.