Fri, May 24, 2019 09:01होमपेज › Satara › राज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती 

राज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती 

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
पाटण : प्रतिनिधी

कोयना प्रकल्प महाराष्ट्राची अस्मिता आहे. सध्याच्या  भाजप, शिवसेना शासनाला पश्‍चिम महाराष्ट्राची असुया निर्माण झाल्यानेच चांगले व जनहिताच्या प्रकल्पांवर जाणीवपूर्वक अन्याय होत आहे. राज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती आली आहे. पिचलेला समाजातील प्रत्येक घटक ही मस्ती उतरल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्‍वास माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी व्यक्‍त केले. 
चाफळ येथे श्रीराम मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. नरेंद्र पाटील, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राजेश पवार उपस्थित होते. 

आ. अजित पवार म्हणाले, जनतेला फसवून सत्तेवर आलेले हे फसवणूक सरकार आहे. सरकार केंद्रातील असो किंवा राज्यातील यांचे मंत्री डॉक्टरांना गोळ्या घालण्याची तर प्रदेशाध्यक्ष शेतकर्‍यांना कंबरेखाली गोळ्या घालण्याची भाषा करतात. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. यांच्या राज्यात शेतकरी, कामगार, नोकरदार, व्यापारी, अंगणवाडी सेविका नव्हे, तर कोणीच समाधानी नाही. हे सरकार सकारात्मक विचारच करत नाही. वेगळा विदर्भ करण्याच्या जोरावर हे सरकार सत्तेवर आले ते आश्‍वासनही ते पूर्ण करू शकले नाहीत. तिच अवस्था उर्वरित महाराष्ट्राचीआहे. एका बाजूला सर्वांची दयनीय अवस्था असताना नोटाबंदी केली, जीएसटी लादून सगळ्यांचे जगणेच कठीण करून ठेवलेे. कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक असून याचा कोणाला आणि किती फायदा झाला हे जगजाहीर आहे. 

कोयना धरणाचे योगदान कोणीही नाकारून चालणार नाही. मात्र तेच प्रकल्प अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. जलविद्युत प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टीकोनच नकारात्मक असल्यानेच या बाबी घडत आहेत. 

विक्रमसिंह पाटणकर यांची दूरदृष्टी होती त्याकाळात कोयनेची शान होती. पर्यटनाचे ते शिल्पकार होते तर पवनचक्क्यांच्या माध्यमातून त्यांनी डोंगरपठारांवरील जनतेचे भाग्य उजळले. बोटींग, अनेक धरणे, मत्स्यप्रकल्प आदिंमुळे पाटण तालुक्याचे नंदनवन झाले ते सत्तेत नसल्यावर काय होते हे जनता अनुभवत आहे. या तालुक्यात पर्यटन विकास हा अजूनही मोठ्या प्रमाणावर होवू शकतो. मात्र यासाठी सकारात्मक विचारांचे लोकप्रतिनिधी असणे गरजेचे असल्याचे मतही आ. अजित पवार यांनी व्यक्त केले.