Fri, Apr 19, 2019 08:40होमपेज › Satara › मराठा समाजासाठी आवाज उठवा

मराठा समाजासाठी आवाज उठवा

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 8:00PMकराड : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने विचार केल्याचा देखावा केला जात आहे. शैक्षणिक फी सवलत, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता याद्वारे केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसने याविरोधात आवाज उठवण्यासाठी कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांकडे मागणी केली.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी सकाळी कराडमधून खटावकडे रवाना झाली. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विश्‍वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेत्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शैक्षणिक फी सवलत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात केवळ 11 टक्केच सवलत मिळत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ताही कमी करण्यात आला असून या पैशात काहीच होऊ शकत नाही. याशिवाय मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही प्रलंबित असून त्याबाबत शासन कोणतीच भूमिका घेत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काँग्रेसने आवाज उठवत मराठा समाज बांधवांना साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी काँग्रेस नेत्यांना केेले. दरम्यान, मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली.

नराधमाचे वकीलपत्र घेऊ नका....

कराड तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत याप्रकरणी पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे. या नराधमांचे आरोपपत्र कराडमधील कोणीही घेऊ नये. तसेच राज्यातील, देशातील वकिलांनीही असेच करावे, असे आवाहन करणारे निवेदन मराठा बांधवांनी सोमवारी सकाळी कराड तालुक्यातील वकिलांच्या संघटनेला दिले.