Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Satara › काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कराडात

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कराडात

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 11:42PMप्रतिनिधी : प्रतिनिधी

कोल्हापूरमधून सुरू झालेली राष्ट्रीय काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रविवार, 2 सप्टेंबरला कराडमध्ये दाखल होत असून सायंकाळी सहा वाजता येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित असणार आहेत.

शुक्रवारी कोल्हापूरमधून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी, बळीराजाच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासह सर्वसामान्यांसह राज्यापुढील समस्या वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्याच्या विविध भागासह कराडमधील जुना कोयना पूल, शासकीय विश्रामगृह यासह रखडलेल्या विकासकामांवरून काँग्रेस नेत्यांकडून शासनावर कडाडून टीका होण्याची चिन्हे आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी योजना आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह मराठा, मुस्लिम तसेच धनगर समाजाच्या आरक्षणांचा प्रश्‍न याबाबतही काँग्रेस नेते कोणती भूमिका घेणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूद्ध आवाज उठवत देश भाजपामुक्त करण्यासाठी आयोजित या जनसंघर्ष यात्रेचे सायंकाळी कराडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर टाऊन हॉलमध्ये सभा होणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँगे्रसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांनी केले आहे.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा उद्या माण-खटावमध्ये एल्गार

खटाव : प्रतिनिधी

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात  जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे सोमवारी माण-खटाव तालुक्यात आगमन होत आहे. वडूज व दहीवडीत या यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून म्हसवड येथे दु.2 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आ. जयकुमार गोरे यांनी या संघर्ष यात्रेची जोरदार तयारी केली आहे. जनसंघर्ष यात्रेत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ. सतेज पाटील, आ.विश्‍वजीत कदम मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. 

जनसंघर्ष यात्रेविषयी माहिती देताना आ.जयकुमार गोरे म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठले  आहे. सत्तीतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांचे धोरण आहे. खोटी अश्‍वासने आणि भूलथापा देऊन जनतेला फसवण्याचा उद्योग सुरु आहे. भाजपा सरकारला हद्दपार करण्यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठीच या जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत माण, खटाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन तालुकाध्यक्ष एम. के. भोसले आणि डॉ. विवेक देशमुख यांनी केले आहे.