Sun, Nov 18, 2018 04:57होमपेज › Satara › युतीमधील मतभेदांचा काँग्रेसलाच फायदा

युतीमधील मतभेदांचा काँग्रेसलाच फायदा

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 11 2018 10:30PMकराड : चंद्रजित पाटील

राज्यासह देशात सत्तेवर असलेल्या भाजपासह मित्रपक्ष शिवसेनेतील मतभेदांमुळे काँग्रेस - राष्ट्रवादीलाच फायदा होतो, असे कराड नगरपालिका निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले होते. त्यामुळेच तोडांवर आलेल्या मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना कोणती भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र सध्यस्थिती पाहता शिवसेना स्वबळावरच लढण्याची दाट शक्यता असून भाजपाला याचा किती फटका बसणार ? याबाबत तर्कविर्तक सुरू आहेत.

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर होणार्‍या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाने माजी मंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. तत्पूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी झाली, तरीही शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कराड तालुक्यातही शिवसैनिक काहीही झाले, तरी स्वबळावरच लढण्याच्या मनस्थितीत आहेत, असे पहावयास मिळत आहे.  

सुमारे दीड वर्षापूर्वी कराड नगरपालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील, शिवसेनेचे अभिजीत हापसे, भाजपाचे दिपक पाटील आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे सथर्मक नगरसेवक राजेंद्र माने यांच्यात चुरशीची तिरंगी लढत झाली होती. या लढतीत राजेंद्र माने यांनी अवघ्या 35 मतांनी निसटता विजय मिळवला होता. तर शिवसेनेचे अभिजीत हापसे यांनी 154 मते मिळवून आपले उपद्रवमूल्य भाजपाला दाखवून दिले होते. माने यांना 1 हजार 174 तर दीपक पाटील यांना 1 हजार 139 मते मिळाली होती. मात्र त्याचवेळी याच प्रभागात भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अंजली कुंभार मात्र 535 मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांच्याविरोधात शिवसेना उमेदवारच रिंगणात नव्हता. त्यामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ होऊन काँग्रेसच्या राजेंद्र माने यांना नगरसेवक पदाची दुसर्‍यांदा लॉटरी लागली होती.

या निवडणूक निकालानंतरही शिवसेना व भाजपा पदाधिकार्‍यांमधील मतभेद आजही कायम आहेत. 1 एप्रिल 2018 रोजी कन्याशाळा परिसरात शशिकांत हापसे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी ‘एप्रिल फूल’ आंदोलन करत भाजपाला घरचा आहेर दिला होता. मलकापूरमध्येही शिवसेनेचे नितीन काशिद यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी यापूर्वीच वरिष्ठांचे मार्गदर्शन व आदेशाप्रमाणेच निवडणुकीत भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच मलकापूरमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे अशी बहुरंगी लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर गटाचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच कराडप्रमाणे मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्यास भाजपाला किती फटका बसणार? याबाबत आत्तापासूनच तर्कवितर्क सुरू झाले आहेत.