Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › जातीयवादी शिवसेनेशी आघाडीचा प्रश्‍नच नाही : पृथ्वीराज चव्हाण 

जातीयवादी शिवसेनेशी आघाडीचा प्रश्‍नच नाही : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Jun 03 2018 4:13PM | Last Updated: Jun 03 2018 4:13PMकराड : प्रतिनिधी 

आघाडीच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असेल, त्याच पक्षाच्या नेतृत्वाला देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणार आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पंतप्रधानपदासाठी कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असला, तरी काँग्रेस या विषयात पडणार नाही. काँग्रेसकडून देशभर धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने शिवसेनेशी आघाडीचा प्रश्‍नच नसल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कराड (जि. सातारा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. 

आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारसह राज्य शासनाने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळेच लोकसभेच्या 10 पोटनिवडणुकीत केवळ पालघरमध्ये काँग्रेसचा उमेदवार पळवल्यामुळे भाजपला यश मिळाले आहे. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजप उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर असे चित्र आहे. त्यामुळेच पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार आहे, असा विश्‍वास आ. चव्हाण यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाहप्रमाणे वागत आहेत. त्यांच्यामुळे संविधान व लोकशाही प्रक्रियाच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत राज्यासह देशात भाजप सरकार सत्तेवर येऊ नये, म्हणून काँग्रेस विरोधी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांशी आत्तापासूनच चर्चा करू लागले आहे. विरोधकांची आघाडी होऊ नये, म्हणून भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्रीही साम, दाम, दंड, भेदची भाषा करू लागलेत. स्वबळावर सत्ता येणार नाही, याची कल्पना भाजप नेत्यांना आली आहे.

त्यामुळेच कोणत्याही स्थितीत ते मित्रपक्ष भाजपपासून दूर जाऊन नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच भाजप शिवसेनेला राज्य सरकारमधून बाहेर पडू देत नसल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले.देशाचा आर्थिक विकास दर घटला आहे. राज्याचा कृषी विकास दर घटला आहे. शेतकर्‍यांना दिलेली आश्‍वासने पाळली जात नाहीत. बुलेट ट्रेनसारखे राज्याला अनावश्यक प्रकल्प जनतेच्या माथी मारले जात असल्याचेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

69 टक्के लोक भाजप विरोधातच

2014 साली भाजपला 31 टक्के मते मिळाली होती. तर शिवसेना, तेलगू देसमसारख्या पक्षांना 8 टक्के मते मिळाली होती. त्याचवेळी सर्व विरोधी पक्षांना 61 टक्के मते मिळाली होती. आता शिवसेना, तेलगू देसमसारखे पक्षही भाजपपासून दुरावले आहेत. त्यामुळेच 31 टक्के विरुद्ध 69 टक्के असा संघर्ष होणार असून, भाजपचा पराभव अटळ आहे, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.