Fri, Apr 26, 2019 04:00होमपेज › Satara › अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ

अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीवरून गोंधळ

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:13PMकोडोली : वार्ताहर

सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकारीच मासिक सभांचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहतात, यावरून सभेत सदस्यांनी गोंधळ घातला. अशा अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात, यावी याबाबतचा ठराव मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर सदस्यांनी ताशेरे ओढले. 

सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आढाव्यादरम्यान बांधकामचे उपअभियंता गेले चार महिन्याच्या मासिक सभांना उपस्थित  नाहीत. आजच्या मासिक सभेसही सभापतींना पूर्वकल्पना न देताच गैरहजर आहेत. या विषयावरून सभेत बराच काळ सदस्यांनी गोंधळ घातला. जोपर्यंत ते सभागृहात उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत त्या विभागाचा आढावा सभेत मांडण्यात येवू नये. संबंधीत उपअभियंत्यांना सभेस गैरहजर राहिल्याबाबत व सभेचा प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल  कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. यापुढे मासिक सभेचा प्रोटोकॉल न पाळता गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा ठराव उपसभापती जितेंद्र सावंत यांनी मांडला. त्यास सदस्य अशुतोष चव्हाण, रामदास साळुंखे यांनी अनुमोदन देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, याच विषयाचा धागा पकडून अनेक अधिकारी शासनाकडून आलेली योजनांची परिपत्रके, जिल्हा परिषदेकडील सूचना सभागृहापुढे मांडत नाहीत. सभापती बी.डी.ओ.यांचा अधिकार्‍यांवर अंकुश राहिला नाही. अधिकार्‍यांचे आओ जाओ चाललेले असते. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. अशा अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल शिंदे, अरविंद जाधव यांच्यासह काही महिला सदस्यांनी केली.शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान बाल आनंद मेळावे जानेवारी महिन्यापर्यंत घेण्यात यावेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत घेण्यात येवू नयेत. तसेच शिक्षक प्रशिक्षणेही सुट्टीच्या कालावधीत घेण्यात येवू नये जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, अशी मागणी सदस्य अरविंद जाधव यांनी केली.

ग्रामीण पाणी पुरवठा आढाव्यादरम्यान कास तलावाच्या पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवरुन परळी खोर्‍यातील 10 ते 15 गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या कास तलावाचे उंची वाढवण्याचे काम सुरू असून पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमधून तेथील जनतेला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप सदस्या सौ. देवरे यांनी केला. वीज वितरणावरील चर्चेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कण्हेरचे वीज बिल थकल्याबद्दल पूर्वकल्पना न देता वीज तोडल्याने गेले सहा दिवस रुग्णांचे हाल झाले. तसेच संबंधित विभागाने धनादेशाने पैसे दिले असता धनादेश  न स्विकारता रोख कॅशची मागणी केली ही गंभीर बाब आहे. शासकीय आरोग्य केंद्रांची वीज बंद करता येत नसताना वीज  बंद केली तसेच थकीत बील चेकने भरत असताना रोख कॅशची मागणी केली तरी संबंधित विभागाची चौकशी करुन तातडीने वीज जोडणी करावी, अशी मागणी जितेंद्र सावंत यांच्यासह सर्वच सदस्यांनी केली. वनीकरण विभागाच्या आढाव्यादरम्यान औद्योगिक वसाहतीमधील 4 कि.मी. रस्त्याच्या कडेला लावलेल्या 2 हजार झाडांपैकी किती झाडे जगली याची प्रत्यक्ष पाहणी संबंधित अधिकार्‍याने करुन पुढील मिटींगला माहिती द्यावी. नुसते कागदी घोडे नाचवून सदस्यांची दिशाभूल करु नका, असे सदस्य रामदास साळुंखे, अशुतोष चव्हाण यांनी सांगितले.

Tags : Satara, Confusion, over,  absence, officials