Sun, Jul 21, 2019 17:04
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पोलिस दलातील ‘झारीतले शुक्राचार्य’ अखेर रडारवर 

पोलिस दलातील ‘झारीतले शुक्राचार्य’ अखेर रडारवर 

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 11:59PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

जिल्हा पोलिस दलाने सातारा शहरासह जिल्ह्यातील नामचीन गुंडांवर मोका व तडिपारीची कारवाई करून ‘साफसफाईची मोहीम’ तीव्र केली आहे. असे असताना गुंड वाढण्यामागे पोलिस दलातीलच काही ‘झारीतले शुक्राचार्य’ असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. मोका प्रकरणात तपास सुरू असताना भानगडबाज पोलिसांचेही ‘रेकॉर्ड’ समोर आल्याने पोलिस दलाशी बेईमानी करणार्‍या अशा पोलिसांची ‘यादी’ बनवण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, यामध्ये प्रामुख्याने एलसीबी, जिविशा, शहर, शाहूपुरी व तालुका पोलिस ठाणे रडारवर आहे.

समाजातील गुंडगिरी वाढण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत.छोट्या व किरकोळ चोर्‍या मार्‍या होत असताना समाजच अशा फाळकूट दादांविरुद्ध आवाज उठवत नाही. यातूनच हे फाळकूटदादा भविष्यात समाजाला डोकेदुखी ठरत आहेत. अर्थात, पोलिसांकडूनही वेळीच अशा उगवत्या भाई, दादामंडळींना ‘डोस’ मिळत नसल्याचेे वास्तव आहे. पोलिस हा समाजाचा आरसा असून समाजातील प्रत्येक बारीक गोष्टींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. दुर्दैवाने मात्र ‘लक्ष्मी दर्शन’ झाले की ‘रेटण्याऐवजी’  अनेकदा ‘गोंजारण्याचा’ प्रकार होत असल्याचे समोर येत असते.  याशिवाय मग लोकप्रतिनिधींची फोनाफोनी झाली की अशा गुंडांना आणखी अभय मिळत असल्याचे चित्र आहे.

सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने पोलिस मुख्यालयाभोवती ‘पिंगा’ घालणार्‍या पोलिसांची लांबलचक यादी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी), सातारा शहर, शाहूपुरी, तालुका, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक विभाग, सायबर पोलिस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या सर्व विभागांची कार्यालये सातार्‍यातच हाकेच्या अंतरावर आहेत. एका विभागात सर्वसामान्य पोलिस सहा वर्षे नियुक्‍त राहतो, असा नियमच आहे. वरील सर्व विभाग पाहिले तर भानगडबाज पोलिस 50 वर्षे सातार्‍यात राहून कर्तव्य बजावण्याची ‘किमया’ करत आहेत. पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदार पदापर्यंत असणारे भानगडबाज पोलिसदादा मंडळी या ठरलेल्या विभागातच पिंगा घालत सेवा करत आहेत. सेवा करण्याबद्दल दुमत नाही मात्र केवळ ‘मेवा’ मिळतो म्हणून आलटून पालटून केवळ याच परिसरात घुटमळत राहणार्‍यांची संख्या लक्षणीय व दुर्दैवी आहे.

सध्या जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचेे अक्षरश:  कंबरडे मोडले आहे. नामचीन व रेकॉर्डवरील गुंडांनी करामत केली की, त्याला थेट मोक्‍का किंवा तडीपार करत कायदा व सुव्यवस्थेची वचक निर्माण केला आहे. अर्थात हे सर्व लगेचच सहज शक्य झालेले नाही. जे सामान्य सातारकर गुंडगिरीमुळे पोळले आहेत एव्हाना भाजून निघाले आहेत ते पोलिस अधीक्षकांना जाऊन भेटले. आतापर्यंत पोलिस ठाणीच मॅनेज होत गेल्याने त्या त्या स्थानिक गुंडांचे फावत गेले.  एसपींकडे येणार्‍या व्हिजिटरमधूनच पडद्याआडसह गुंडांची माहिती मिळत गेली व त्यातूनच अनेकांच्या ‘कुंडल्या’ तयार होत गेल्या. अशा सर्व गुंडांच्या मुसक्या आवळत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातार्‍यातील गुन्हेगारीची साफसफाई केली.

सध्या मोक्‍का, तडीपारीचा धडाका सुरु असतानाच तपासामध्ये अनेक धक्‍कादायक बाबी समोर आल्या आहेत. टोळीचा म्होरक्या व त्यातील पंटर हे काही पोलिसांच्या नित्यनियमाने संपर्कात असल्याचे समोर आले आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी), सातारा शहर, शाहूपुरी, तालुका, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक विभाग याठिकाणी कार्यरत असणार्‍या पोलिसांची संख्या अधिक आहे. याठिकाणी काम करणारे काही ‘झारीतील शुक्राचार्य’ हे गुंडांना ‘टीप’ देणे, त्यांना मदत होईल, असे कृत्य करत असल्याचे  सत्य समोर आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही त्याबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कोण कोण अडकणार चौकशीच्या फेर्‍यात?

आतापर्यंत मोका व तडिपार केलेल्या गुंडांच्या संपर्कात व त्यांना मदत करणार्‍या पोलिसांची यादी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशा पोलिसांमुळे गुंडांना मदत झाल्याने पोलिस दलाचे मोठे नुकसान झालेले आहे. गुंडांचे नेटवर्कच पोलिस दलात कार्यरत राहिल्यानेच गुंडांना भय राहिले नाही व त्याचा समाजातील सर्वसामान्य नागरिकाला मोठा त्रास झालेला आहे. त्यामुळे आता गुन्हेगारीच्या संबंधित व त्यांच्या संपर्कात असणारे पोलिसच चौकशीच्या फेर्‍यात अडकणार आहेत. त्यामुळे कुणाकुणाचा नंबर लागणार, याची धास्ती पोलिसांना लागून राहिली आहे.