होमपेज › Satara › रेल्वेची कामे वेळच्यावेळी पूर्ण करा : उदयनराजे भोसले 

रेल्वेची कामे वेळच्यावेळी पूर्ण करा : उदयनराजे भोसले 

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 12:21AMसातारा : प्रतिनिधी 

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक भुमीवरील सातारा रेल्वेस्टेशन हे  हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकसित करण्यासह सातारा लोकसभा मतदार संघातील विविध कामांचा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या अधिका-यांसमवेत आढावा घेतला. त्याचबरोबर ही सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण झाली पाहिजे, त्यामुळे लोकांचे हित साधले जाणार आहे, अशी आग्रही भुमिका मांडली.

रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गात येणा-या रेल्वे प्रश्‍नांबाबत रेल्वेच्या महाप्रबंधकांनी डिआरएम ऑफिस पुणे येथे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. अनिल शिरोळे, खा. वंदना चव्हाण, खा.आढळराव पाटील, खा.संजयकाका पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील, खा. शरद बनसोडे, खा. सदाभाऊ लोखंडे, सेन्ट्रल रेल्वेचे महाप्रबंधक एस. एम. शर्मा, पुणे डिआरएम देवूस्कर, मुख्याधिकारी तिवारी, गुप्ता, वाणिज्य अधिकारी कृष्णा पाटील यांच्यासह अशोक सावंत, काका धुमाळ, माजी नगरसेवक संजय शिंदे, संग्राम बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. उदयनराजे भोसले यांनी पुणे ते मिरज या लोहमार्गावर सध्या एकच रेल्वे मार्ग आहे, त्याचे दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरता ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना मोबदला देण्याची मागणी केली. याशिवाय लोणंदच्या औद्योगिक वसाहतीलगत रेल्वे गुडस् शेड उभारणे,  रेल्वेच्या मालाची चढ-उतार करण्यासाठी, कायद्याने मान्यता असलेल्या रजिस्टर माथाडी बोर्डातील माथाडी कामगारच असेल पाहीजेत, बहिस्थ व्यक्तींचे तेथे चोचले पुरवले जावू नयेत, कराड-सातारा-पुणे डेली शटल सेवा सुरु करावी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, तसेच या मार्गावर गतीमान रेल्वे वाहतुकीसाठी दुहेरी लोहमार्ग उभारणे,  कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग यासह वाठारस्टेशन, रहिमतपूर, मसूर येथे रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी ओव्हरब्रीज उभारणेच्या आदींबाबतच्या मागण्या त्यांनी बैठकीत लावून धरल्या. सातारा रेल्वेस्टेशनचा विकास हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून करणेबाबत आम्ही तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्यासमवेत तसेच विद्यमान रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्याकरता सातारा रेल्वेस्टेशनचा हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकास करण्याबाबत जरुर तो प्रस्ताव तयार करुन, सादर करण्याचेही खा. उदयनराजेंनी सुचित केले. खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच भारतीय रेल्वे खात्याला मौलिक सूचना केल्या आहेत.  त्यांच्या सूचनांचा आदर केला जावून, रेल्वेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिक भर दिला जाईल, असे रेल्वेचे जनरल मॅनेजर शर्मा यांनी यावेळी नमूद केले.