Sat, May 25, 2019 23:44होमपेज › Satara › अजिंक्यताराकडून ऊस बिलाची संपूर्ण रक्‍कम अदा

अजिंक्यताराकडून ऊस बिलाची संपूर्ण रक्‍कम अदा

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

अतिरिक्‍त  साखर उत्पादनामुळे 2017-18 या नुकत्याच झालेल्या गळीत हंगामात साखरेचे दर सतत घसरत गेले. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत सापडलेला होता. अशाही अडचणीच्या परिस्थितीत अजिंक्यतारा कारखान्याने आर्थिक अडचणीतून मार्ग काढून सभासदांच्या विश्‍वासाला  तडा जाणार नाही यासाठी काटकसरीचे धोरण अवलंबून हंगामात नेत्रदिपक कामगिरी केली आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफ.आर.पी प्रमाणे ऊस बिलाची संपूर्ण रक्‍कम अदा केली असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. 

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावत ठेवण्यासाठी त्यांच्या उसाला किफायतशीर दर दिलाच पाहिजे, हे स्व.भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न होते. या स्वप्नाची पूर्ती होत असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले. 2017-18 चा गळीत हंगाम हा अडचणीचा व आव्हानात्मक होता, परंतु अशाही परिस्थितीमध्ये संचालक मंडळाचे योग्य व परिणामकारक नियोजन करून हंगाम अपेक्षेप्रमाणे व सर्व ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या सहकार्यामुळे यशस्वी केला. या हंगामात कारखान्याने  नेत्रदिपक कामगिरी करून 6,48,616 मे.टन ऊसाचे गाळप करून 12.22 टक्के साखर उतार्‍याने 7,92,570 क्‍विंटल साखर उत्पादन केले. शासन निर्धारित सुत्रानुसार अजिंक्यताराची एफ.आर.पी प्रति मे.टन रू.2640 निघाली आहे. 

परंतु गळीत हंगामात साखरेचे दर जसजसे कमी होत गेले तसतसे साखरेचे मुल्यांकन कमी होत गेले. याचा प्रतिकूल परिणाम झाला आणि एफआरपीप्रमाणे ऊसाचे बिल आदा करणे जिकरीचे झाले होते. अशाही परिस्थितीत संचालक मंडळाने योग्य ते नियोजन करून दि. 15 मार्च 2018 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे वेळेतच पेमेंट आदा केले. 

एप्रिलमध्ये साखरेच्या दरामध्ये घसरण होवून मुल्यांकन दर कमी होवून प्रति क्‍विंटल रू 2920वरून दि.4 मे 2018 पर्यंत रू.2,575 पर्यंत आले. यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून केन पेमेंटसाठी रू. 1,730 वरून रू.1,440 पर्यंत प्रति.मे.टन उपलब्ध झाले. 

परंतु ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना प्रतिकूल परिस्थितीमध्येही कारखान्याने स्वनिधीचा वापर करून दि.16 मार्चपासून गाळप हंगाम बंद होईपर्यंत गाळपास आलेल्या एकूण 1,50,916.005 मे.टन ऊसाला प्रति.मे.टन रू.2000 प्रमाणे दर पंधरवडा पेमेंट वेळेत केले आहे. 

सध्या शेतकर्‍यांचे पेरणीचे दिवस, बियाणे व रासायनिक खत खरेदी, मानवी मजूरी आदी खर्चासाठी शेतकर्‍यांना अडचणीचे जाऊ नये यासाठी  संचालक  मंडळाने एकुण 1,50,916.005  मे.टन ऊसाचे उर्वरीत देय पेमेंट प्रती टन रू.640 प्रमाणे होणारी रक्‍कम 9 कोटी 65 लाख 86 हजार 285  रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. पुढील 2018-19 मध्येही साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून हा हंगामही यशस्वीपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे, असे जरी असले तरी गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिणामकारक नियोजनाची आखणी संचालक मंडळाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.