Sat, Mar 23, 2019 16:51होमपेज › Satara › कॅन्सर हॉस्पिटलविरोधात ‘प्रदूषण’कडे तक्रार

कॅन्सर हॉस्पिटलविरोधात ‘प्रदूषण’कडे तक्रार

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:28PM

बुकमार्क करा
शेंद्रे : वार्ताहर 

शेंद्रे, ता. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलचा जैविक कचरा परिसरातील ओढ्यालगत आढळून आल्याने ग्रामपंचायतीने पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, गटविकास अधिकारी, जि. प. आरोग्य विभाग यांना पत्राद्वारे कळवले आहे. 

शेंद्रे येथील या कॅन्सर हॉस्पिटलचा  जैविक कचरा लगतच्या ओढ्यात पसरत होता. याबाबत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने  समजही दिली होती. तरीही हे हॉस्पिटल लगतच्या ओढ्यालगत, शिवचा ओढा येथे जैविक कचरा टाकत आहे. तसेच ओढ्यात या हॉस्पिटलचे सांडपाणी सोडत असल्याने दुर्गंधी पसरत चालली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा ओढा भोसलेवाडी वस्ती शेजारुन वाहत आहे. या ओढ्यालगत या वस्तीची पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने या वस्तीचा आरोग्याचा गंभीर प्रश्‍न बनला आहे. तोच ओढा उरमोडी नदीला मिळत असल्याने येथील पाणीही दूषित होवू लागले आहे. या नदीला वेचले, शिवाजीनगर, शेंद्रे, पाडळी या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असून हॉस्पिटलच्या सांडपाण्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यचा धोका आहे. 

मध्यंतरी पावसाळ्यात लगतच्या ओढ्यात जैविक कचरा आढळून आला तसेच मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात आल्याने दुर्गंधी पसरली होती. भोसलेवाडी येथील नागरिकांनी हॉस्पिटल विरोधात जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, प्रदूषण मंडळास निवेदन देण्याचे ठरले होते. निवेदनही तयार होते परंतु ही बाब हॉस्पिटलच्या संस्थापकांना समजल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. अशा घटना घडत असताना दोनच दिवसांपूर्वी शिवचा ओढ्यालगत उपसरपंच नंदूभाऊ यादव यांना जैविक कचरा उघड्यावर टाकल्याचे पुन्हा आढळून आले. त्यांनी ग्रामपंचायतीचे सहकारी, सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा केला हा कचरा ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलचाच असल्याचे निदर्शनास आले. सिरीज, जखम पट्ट्या, सिरीज कव्हर्स, प्‍लास्टिकचे मोकळे बॉक्स इ. बाबी दिसून आल्या तसेच हॉस्पिटलचे सांडपाणी देखील लगतच्या ओढ्यात उघड्यावर सोडले जात असल्याचेही पाहणीदरम्यान निदर्शनास आले. त्यानुसार पंचनामा करण्यात आला आहे.   ग्रामपंचायतीने वारंवार समज देवूनही हे हॉस्पिटल हलगर्जीपणा व दुर्लक्ष करत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपसरपंच नंदूभाऊ यादव यांनी सांगितले. यावेळी विष्णू जाधव, संतोष पाटील (पोतेकर) पोलिस पाटील उमेश यादव, माजी चेअरमन विजय पोतेकर उपस्थित होते.