Thu, Apr 25, 2019 15:57होमपेज › Satara › अ‍ॅपव्दारे करा स्वच्छतेविषयी तक्रार

अ‍ॅपव्दारे करा स्वच्छतेविषयी तक्रार

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 7:50PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायत ‘स्वच्छता सर्व्हेक्षण 2018’ करीता स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व शहरातील नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या. 

शासनातर्फे स्वच्छता सर्व्हेक्षण अंतर्गत देशातील शहरांचे मूल्यमापन केले जाणार आहे. यामध्ये मलकापूर नगरपंचायतीचा समावेश असून शहरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी या दृष्टीने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. याची पूर्व तयारी म्हणून 43 स्वच्छता कामाविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करावयाचे आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती व्हावी व लोकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, याकरीता विविध सोशल मिडीयाव्दारे नागरिकांच्यात प्रबोधन केले जात आहे.

मलकापूर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी शहरातील नागरिकांनी दैनंदिन कामाबरोबरच स्वच्छतेविषयी आपले प्रश्‍न मांडता यावेत याकरीता केंंद्र शासनाने स्वच्छता अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्या आधारे शहरामधील स्वच्छतेविषयी तक्रारी करत येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मृत प्राणी उचलणे, कचरा पेटी स्वच्छ नसणे, रस्त्यालगत असणारा कचरा उचलणे, कचर्‍याची घंटागाडी न येणे, रस्त्याची स्वच्छता नसणे, प्रसाधन गृहे स्वच्छ नसणे, गटर तुंबणे इत्यादी बाबींकरीता अ‍ॅप विकसित केले आहे.

यामध्ये नागरिकांनी तक्रारीबाबतचा फोटो या अ‍ॅपव्दारे नगरपंचायतीस पाठवायचा आहे. नागरीकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे निरसन केल्याबाबत संबंधित नागरिकास अ‍ॅपच्या आधारे अभिप्रायाव्दारे कळवायचे आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये बचत होऊन दैनंदिन कामाबरोबर आपल्या तक्रारी नगरपंचायतीस देणे शक्य होणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंद यांनी सांगितले.   

कार्यशाळेस शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गटांच्या सदस्या, शहरातील शाळा, कॉलेज, महाविद्यालयांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विविध सामाजिक संघटनेचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.