Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Satara › भोंदू हैदरअलीविरोधात पत्नीचीही तक्रार

भोंदू हैदरअलीविरोधात पत्नीचीही तक्रार

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:56PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

पुणे येथे बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या सातार्‍यातील हैदरअली शेख  (रा. गुरुवार पेठ) या भोंदू बाबाचा आणखी एक कारनामा समोर आला असून स्वत:च्या पत्नीवर लग्नापूर्वी भूतबाधा झाली असल्याचे खोटे सांगून बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार ही हैदरअलीची पत्नी असून तिने पहिल्या पतीपासून तलाक घेतल्यानंतर सन 2011 मध्ये त्याच्याशी लग्न केलेले आहे. पत्नी असलेली संबंधित महिला ही 38 वर्षीय आहे. 

1996 साली तिचा पहिला विवाह झाला होता. तिचे माहेर सातारा असून सांगली जिल्ह्यात पहिली सासुरवाडी आहे. संबंधित महिलेची 2007 साली प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात दाखवले; मात्र तब्येत सुधारली नव्हती. 2008 मध्ये सातार्‍यात माहेरी आल्यानंतर महिलेच्या भावाने हैदरअली याच्याकडे नेले. हैदरअली याने तिला भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. भूतबाधा उतरवण्यासाठी दोन दिवस मंत्र-तंत्र उपचार करावे लागतील, असेही सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

महिलेला उपचारासाठी दुसर्‍यांदा घेऊन गेल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींना बाहेर जाण्यास सांगितले. याचवेळी भोंदू हैदरअली याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिला विवस्त्र करून बलात्कार करत त्याने मोबाईलमध्ये त्याचे शुटींगही केले. महिला शुध्दीवर आल्यानंतर हैदरअलीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली व या घटनेबाबत कोणाला काहीही न सांगण्यास सांगितले. नाहीतर बलात्कार केलेले शुटींग सर्वांना दाखवण्याची धमकी दिली. दरम्यान, यावेळी महिलेचा मोबाईल नंबर घेवून तो जेव्हा फोन करुन बोलावेल तेव्हा तेव्हा येण्यास सांगितले.

महिलेला तिच्या सासरी सोडू नये, यासाठी हैदरअलीने कारस्थान केले. महिला सासरी गेली तर भूतबाधेतून मुक्त होवू शकणार नाही असे सांगितले. दरम्यानच्या काळात हैदरअली वारंवार महिलेला फोन करुन तिच्याशी अश्‍लील संवाद साधत होता व तिला अश्‍लील बोलण्यास भाग पाडून तो ते संवाद रेकॉर्डिंग करत होता. हैदरने महिलेच्या कुटुंबियांना एवढी भुरळ पाडली होती की त्या महिलेला तो राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेण्यास सांगितले. यावेळी उपचाराच्या नावाखाली तो महिन्यातून 10 ते 12 वेळा येवून बलात्कार करत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

एकीकडे महिलेवर अत्याचार होत असताना तिच्या तब्येतीमध्ये फरक पडत नसल्याने तिच्या भावांनी दुसर्‍या मांत्रिकाकडे दाखवले असता त्या मांत्रिकाने कोणतीही भूतबाधा झाली नसल्याचे सांगितले. हैदरअलीने त्या महिलेला तिच्या पतीपासून तलाक घेण्यास सांगितल्यानंतर महिलेने नकार दिला. हैदरने पुन्हा धमकावत व्हिडीओ शुटींग दाखवण्याची धमकी देवून महिलेच्या कुटुंबामध्ये भांडणे लावली. महिलेचा पती वाईट असून त्याला वेगवेगळे नाद आहेत. त्यामुळे बहिणीला तलाक घ्यायला सांगा, असेही हैदरने महिलेच्या भावांना सांगितले. पहिल्या पतीशी तलाक झाल्यानंतर मग हैदरने सन 2011 मध्ये त्या महिलेशी विवाह केला व त्यावेळी जबरदस्तीने एकूण सुमारे 30 तोळे वजनाचे सोने जबरदस्तीने घेतले व ते त्याने विकून टाकले.

याप्रकरणी मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात हैदरअली शेख याच्याविरुध्द बलात्कार, महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, फसवणूक, अनैसर्गिक कृत्य, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

हैदरने तिच्या कुटुंबीयांना बनवले होते ‘उल्लू’

आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा बागुलबुवा हैदरअली नेहमीच करत होता. आलेल्या लोकांचा विश्‍वास बसावा यासाठी तो कुटुंबातील सदस्यांनाही उल्लू बनवत होता. तक्रारदार महिलेला दुसर्‍या भोंदू बाबाकडे दाखवल्याचे त्याला समजल्यानंतर हैदरअली चिडला. सातार्‍यातून महिला सासरी सांगलीकडे जात असल्याचे हैदरला समजले. त्याने महिलेला फोन करून ‘तू आत्ता लगेच सातारा स्टँडवरून सांगलीकडे न जाता पुण्याला जायचे, तसेच एसटीमध्ये बसल्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ करण्यास सांगितले.

असे न केल्यास तुझा व्हिडीओ पतीला सेंड करेन.’ महिला सातार्‍यातही नाही व सासरीही नसल्याने त्या कुटुंबीयांनी हैदरअलीशी संपर्क साधून महिला बेपत्ता असल्याचे सांगितले. यावर हैदरने दैवी शक्तीचा आव आणत ‘तुम्ही पुणे येथील स्टँडवर महिलेचा शोध घ्या, ती सापडेल’, असे सांगितले. कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती महिला सापडली. अशा प्रकारे हैदरअली त्या कुटुंबीयांनाही ‘उल्लू’ बनवत होता.