Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Satara › निवडणुका आल्या की काहींना अंगात येतं : आ. शिवेंद्रराजे 

निवडणुका आल्या की काहींना अंगात येतं : आ. शिवेंद्रराजे 

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:26PMकुडाळ : प्रतिनिधी

जनतेच्या संसारावर पाय ठेऊन महू-हातगेघर धरणाचे काम घाई गडबडीत सुरू करू नये.  निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना अंगात येत आणि दिसेल तिथं जाऊन नारळ फोडायची उपरती येते. धरणच पूर्ण करायचे होते तर भरघोस निधी का दिला नाही. कोणाला जर निवडणुकीचे वेध लागलेत म्हणून इथं येऊन राजकारण करू नये, अशी टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जि.प सदस्य दीपक पवार यांच्यावर नाव न घेता केली. 

महू-हातगेघर धरणग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने धरणग्रस्तांचे उपोषण सुरू आहे. त्यावेळी आयोजित सभेत आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, पं स. सदस्य सौ. जयश्री गिरी, सौरभ शिंदे,  धरणग्रस्त कृती समितीचे नेते स. म. बेलोशे गुरुजी, तुकाराम घाडगे, श्रीपतराव रांजणे, विजय रांजणे, गोपाळ बेलोशे, हणमंतराव रांजणे व धरणग्रस्त उपस्थित होते. 

यावेळी आ. शिवेंद्रराजे म्हणाले, भाजप सरकारने व शासनाने पैसे देऊन उपकार केले नाहीत. अनेक वर्षांपासून या धरणग्रस्तांसाठी आम्ही लढा देत आलो आहोत. सरकार आमचं होतं. त्यावेळी याच भाजप सरकारने वेळो वेळी धरणाच्या सुरू होणार्‍या कामाला आडकाठी आणत सुप्रमा मध्ये अडकवण्याचे पाप केले. धरणाचे आज पर्यंतचे जे काम रखडले ते याच युती सरकारच्या खो घालण्याच्या पद्धतीमुळे. पुनर्वसनाचा प्रश्‍न घेऊन धरणग्रस्तांच्या बरोबर पूर्वी होतो, आता आहे व भविष्यातही सोबत राहणार आहे.

वसंतराव मानकुमरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी जर दीपक पवार यांच्या मागे पुढे करून धरणावर काय उद्योग केले तर गाठ माझ्याशी आहे. पुन्हा यापुढे धरणावर फिरू देणार नाही. आमचा धरणाला विरोध नाही पुनर्वसन आधी करा. पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी भुमिपुत्रांची अवहेलना करणार असतील तर मी पण शेतकर्‍याचा पुत्र आहे. माझंही मनगट लेचंपेचं नाही. पुनर्वसनाकरता हजार वेळा जेलमध्ये घाला, वसंतराव आत जायला तयार आहे, असे भावनिक आवाहन केले.